ऑक्सिजन पुरवठ्यावरून पियुष गोयल भडकले
नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.
महाराष्ट्रालाच सर्वाधिक ऑक्सिजन
आतापर्यंत भारतात सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र राज्य सरकारांशी रोज संपर्कात असून शक्य तेवढी मदत करत आहे. पंतप्रधानांनी नुकतंच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्रानं एकत्रितरित्या काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. एवढं सर्व असतानाही उद्धव ठाकरे सरकार याचं राजकारण करत असल्याचं पाहून वाईट वाटल्याचं पीयूष गोयल म्हणाले आहेत.
अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार
उद्धव ठाकरेंवर पीयूष गोयल यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या रोजच्या निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवून आता जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचं गोयल म्हणाले. महाराष्ट्र सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारच्या तावडीत असून, केंद्र सरकार लोकांसाठी शक्य तेवढे चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.
जबाबदारी स्वीकारा
राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेचा उल्लेख करतही गोयल यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील लोक अत्यंत कर्तव्यनिष्टपणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आता राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्याची वेळ आली असून, त्यांनीही ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ पार पाडवी असं गोयल यांनी म्हटलं आहे.