कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाइन्समध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार करताना रेमडेसिवीर आणि स्टिरॉईड्सचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये (Comprehensive Guidelines for Management of COVID-19 in Children) लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस करण्यात आलेली नाही. तसंच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
नव्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोनाबाधित मुलांना अँटी व्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये. त्याचसोबत असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोनाबाधित मुलांवर उपचार करताना त्यांना स्टिरॉइड देणं टाळा.
१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस करण्यता आलेली नाही. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांना अस्थमा आहे. त्यांच्यासाठी या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आलेला नाही, गाईडलाइन्समध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार, जर एखाद्या रुग्णास कोरोनाची तीव्र लक्षणं आढळून आली तर अजिबात उशीर न करता ऑक्सिजन थेरपी सुरु केली जावी.
लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य कोरोना केसेसमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या कोरोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. “स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत,” असं मार्गदर्शक तत्वात सांगण्यात आलं आहे.
तज्ञांच्या मते स्टिरॉईडसर्रासपणे होणारा वापर देशात काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होण्याचं कारण आहे. तसंच पाच वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका आणि सहा ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान यावेळी डॉक्टरांना अत्यंत गरज असेल तरच कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी सांगण्यात यावं असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.
[…] […]