(Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या विरोधात राज्यभर महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. राज्यात ठिकाठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. हे शिवद्रोही सरकार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला तुम्ही राजकारण करत आहात असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे खाजवत बसत आहेत, खाजवू द्या त्यांना, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. याप्रकरणात चुकीला माफी नाही, असे त्यांनी सरकारला सुनावले. त्यामुळे महाविकास आघाडी आता याविषयीचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले कि महारष्ट्रात शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली, माफी मागितली नसती तर तुम्हाला महाराष्ट्राने ठेवलं नसतं. माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. माफी मागताना मग्रुरी कसली दाखवता असा प्रश्नही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते. सोबत दीड शहाणे होते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांन लगावला. ते माफी मागत असताना हे सर्वजण हसत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला.