मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल दि. 9 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी आले होते. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन करताना पूर्वीच्या सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) कोल्हापूरात ४,200 कोटींच्या विविध विकास कामांचा प्रारंभ केला. आयटी आय पार्कसाठी जमीन देणार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली शिंदे म्हणाले महायुतीचे सरकार घेणारे नाही, तर जनतेला देणारे सरकार आहे. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते, तर आमचे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीज म्हणून हप्ते टाकत आहे. त्यांच्या मते, आता हरियाणाच्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते, त्यामुळे जनतेने महायुतीला साथ देण्याचं आव्हान त्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर तिरकस टिप्पणी करत, अडीच वर्षांच्या कामकाजात लोकांनी काय पाहिलं आणि महायुतीच्या दोन वर्षांच्या कार्यात काय गोडवा आहे, याची तुलना केली. त्यांनी लाडकि बहिण योजनेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले, “ज्यांनी या योजनेला फसवी ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता जनतेच्या खिशातून पैसे काढून घेणं अवघड होईल. विरोधक आचारसंहितेच्या काळात या योजनेचा लाभ थांबवण्याचा गैरसमज पसरवत होते परंतु सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ते बहिणींना अगोदरच दिले आहेत असे सांगितले.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. 2019 आणि 2021 साली कोल्हापूरला पुराचा फटका बसला त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मदत केली. येणाऱ्या काळात कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर-सांगलीच्या पूर नियंत्रण कामासाठी 3200 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ज्यामुळे कोल्हापूरच्या विकासात नवा अध्याय सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात कोल्हापूरच्या भविष्याबद्दल मोठे आशावाद होते. ते म्हणाले, कोल्हापुरला (Kolhapur) आता देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर स्थान मिळवायचे आहे. हा दिवस कोल्हापुरासाठी ऐतिहासिक ठरला, असं त्यांनी सांगितलं. आमच्या कामामुळे जनतेत विकासाची आशा निर्माण झाली आहे, आणि हेच महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे.