दि. २८ ऑक्टोबर : कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी विराट शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeet Ghatge) यांना हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवलं आहे. त्यामुळे कागलची लढाईत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेले दिसून येते.
कागलमध्ये मुश्रीफ यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच माजी खासदार संजय मंडलिक आणि संजय घाटगे हे सुद्धा याठिकाणी उपस्थित असल्यामुळे विरेंद्र मंडलिक बंडखोरी करतील या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.
आजची ही मिरवणूक विजयाची मिरवणूक असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच विरोधक म्हणजे पाण्यावरील बुडबुडे असल्याचे म्हणत त्यांनी समरजितसिंह घाटगेंवर (Samarjeet Ghatge) जोरदार टीका केली.
तत्पूर्वी आज वसुबारस असल्याने हसन मुश्रीफ यांनी गोमातेचे विधिवत पूजन करत आरती केली. यावेळी मुश्रीफ यांनी गोमातेचा विजय असो अश्याही घोषणा दिल्या.
महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तसेच पुढील काही दिवस गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांनी लगावला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केलं. महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा करत मी मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो असे ते म्हणाले. आपण आजपर्यंत इतकं वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आहे की देशांमधील कोणत्याही नेत्यानं एवढं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं नसल्याचे ते म्हणाले. मुश्रीफ पुढे म्हणाले की आतापर्यंत राजकारणात मी इतकी गर्दी पाहिली नव्हती. जवळपास एक लाख लोक या शक्तीप्रदर्शनाला उपस्थित आहेत. पुन्हा संधी दिल्यास मी तुमचा हमाल म्हणून काम करेन असेही ते म्हणाले.