Parali Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात परळी विधानसभा मतदारसंघ हा प्रमुख मानला जातो. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेवून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. नुकत्याच झालेल्या बीड लोकसभेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता सध्या त्या विधान परिषदेच्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे परळी विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
२०१९ परळी विधानसभा निकाल :
उमेदवार | पक्ष | मते | टक्केवारी |
धनंजय मुंडे | राष्ट्रवादी काँग्रेस | १,२२,११४ | ५४.४५% |
पंकजा मुंडे | भाजप | ९१,४१३ | ४०.७६% |
२०१९ परळी विधानसभा निवडणूक ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात होती. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा ३०७०१ मतांनी परभा झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे अजित पवार गटाच्या सोबत असल्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे महायुतीत एकत्र आहेत. परळी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर धनंजय मुंडे यांना ही निवडणूक सोपी जाईल असे चित्र होते परंतु सध्या धनंजय मुंडे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे तगडे आव्हान असणार आहे.
परळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून इच्छुकांची गर्दी :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभेत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसापूर्वी राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीकडून धनंजय मुंडे हे निश्चित उमेदवार असणार आहेत परंतु यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे नेमकी संधी कोणाला मिळणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजेसाहेब देशमुख, बबन गिते, राजेभाऊ फड, फुलचंद कराड आणि सुदामती गुट्टे हे महाविकास आघाडीकडून संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत.
मराठा आणि ओबीसी समाजाचा प्रभाव :
बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे. या भागातच मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला होता. त्याचबरोबर राज्यात असलेल्या सरकारच्या आरक्षणाच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे परळी विधानसभा निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा फटका हा लोकसभेत बसलेला दिसून येतो. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे परळी विधानसभेतून मराठा समाजाचे उमेदवार देवू शकतात अशी दाट शक्यता आहे. परळी विधानसभेत ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा प्रभाव या विधानसभेत दिसून येतो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज खूप महत्वाचा ठरतो.