“आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय…” या विरोधकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता “आम्हाला पटलंय, गोकुळ चांगलं चाललंय…” याच जोरदार आगमन सत्ताधाऱ्यांनी केलं आहे… #गोकुळ
गोकुळ या दूध संघासाठी 2 मे रोजी मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. एका बाजूला हे सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मोट बांधली आहे. तर सत्ताधारी गटातील काही संचालक विरोधकांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच गोकुळ दूध संघाची निवडणूक चुरशीची झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक आणि आवाडेंची भेट झाली..
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक आणि आवाडेंची भेट झाल्याची माहिती आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सहकारमहर्षी आणि काँग्रेसचे माजी नेते कल्लाप्पाण्णा आवाडे , तसेच त्यांचे पुत्र – आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांची भेट घेतली. मात्र या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या निवासस्थानी महादेवराव महाडिक यांनी सदिच्छा भेट घेतली.
कोण आहेत प्रकाश आवाडे?
प्रकाश आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. वडील आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला. काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रकाश आवाडेंनी मंत्रिपद उपभोगलं आहे. 1985 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी प्रकाश आवाडेंची पहिल्यांदा निवड झाली. प्रकाश आवाडे हे 1988 ते 1990 या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. नंतरच्या काळात कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. 1995, 1999, 2004 मध्येही आमदारपदी निवड झाली.
महादेवराव महाडिक यांचं कोल्हापुरात वर्चस्व
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या महाडिक कुटुंबाने गेल्या तीन दशकांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. ताराराणी आघाडीच्या स्थापनेतून त्यांनी महापालिकेचं राजकारण ढवळून काढलं. तब्बल 18 वर्ष विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी महापालिका, गोकुळ दूध संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा कृषी उत्पन्न समिती अशा प्रमुख संस्थांवर सत्ता गाजवली आहे.
पुतण्या धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतून खासदार केलं, तर पुत्र अमल महाडिक यांना भाजपकडून आमदारकी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. सून शौमिका यांना जिल्हा परिषद सदस्य बनवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मात्र 2016 मध्ये विधानपरिषद निवडणुकीत त्यांना एकेकाळचा राजकीय चेला असलेले काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. महाडिकांची भाजपशी जवळीक आहे. आता गोकुळ दूधसंघाच्या निवडणुका तोंडावर असल्याने आवाडेंच्या भेटीने महादेवराव कोणती राजकीय गणितं जुळवणार, याकडे लक्ष लागलं आहे.
“आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय…” या विरोधकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता “आम्हाला पटलंय, गोकुळ चांगलं चाललंय…” याच जोरदार आगमन सत्ताधाऱ्यांनी केलं आहे… #गोकुळ
शाहू शेतकरी आघाडीतून माजी आमदाराला फोडलं
कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत अवघ्या चार दिवसात फूट पडली. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याची घोषणा केली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरुडकरांनी निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलंय.
गोकुळ दूध संघाचे एवढे महत्व का…
दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक
रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन
मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी
गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल
गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात
आत्तापर्यंत 218 उमेदवारी अर्ज दाखल
गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 25 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 1 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दोन दिवसात केवळ 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज मात्र तब्बल 195 अर्ज दाखल झाले असून आजपर्यंत एकूण 218 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आज अनेक दिग्गज नेत्यांसह त्यांच्या मुलांनीही अर्ज दाखल केले आहेत.
सोशल डिस्टन्सचा फज्जा
एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करायला उमेदवार आल्याने यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांपासून शासकीय सुट्टी होती त्यामुळे आज सकाळपासून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्याचे समर्थक करवीर प्रांत ऑफिसमध्ये दाखल झाले. सगळेच उमेदवार आणि त्याचे समर्थक एकदम अर्ज दाखल करण्यासाठी आल्यामुळे त्याठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. करवीर प्रांत ऑफीस हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे, असे असताना याच ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.