Monday, March 25, 2024
No menu items!
Homeशरद पवार ग्रामसमृद्धी योजना | योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना | योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?

- Advertisement -

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून  ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ‘(Sharad Pawar Gram Samridhi) राबवली जात आहे.

3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण, ही योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे.

त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील.

1) गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे

यात 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे.
6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.

2) शेळीपालन शेड बांधणे

10 शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरता तिप्पट अनुदान दिलं जाणार आहे. पण, अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

3)  कुक्कुटपालन शेड बांधणे

100 पक्ष्यांकरता शेड बांधायचं असेल तर 49, 760 अनुदान दिलं जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे. पण, समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर यंत्रणेनं शेड मंजूर करावं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणं बंधनकारक राहिल.

 4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे.आता या चारही कामांमधील बांधकामासाठी लांबी, रुंदी जमिनीचं क्षेत्रफळ किती असावं याची माहिती शासन निर्णयात सविस्तर दिली आहे.

इच्छुक व्यक्तींनी आपल्या ग्रामपंचायत/पंचायतसमितिच्या संपर्कात राहून या योजनेचा लाभ घ्यावा.

facebook

खाली क्लिक करा.

अर्ज कसा करायचा?

सुरुवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करायची आहे. त्याखाली ग्रामपंचायतचं नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे दिनांक टाकून फोटो चिकटवायचा आहे.

त्यानंतर अर्जदाराचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.

तुम्ही पाहू शकता की मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची इथं यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यानं नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्यांचं कॉंक्रीटिकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवं त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इथं प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडायचा आहे. यात अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचीत जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे. तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडायचा आहे. लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का, असल्यास हो म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे. लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडायचा आहे. तसंच तुम्ही निवडलेलं काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, ते सांगायचं आहे. अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षावरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहायची आहे. शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.

यासोबत मनरेंगाचं जॉब कार्ड, 8-अ, सातबारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडायचा आहे. यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं एक शिफारस पत्र द्यावं लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचं सांगितलं जाईल. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केलं जाईल. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. पण, तुमच्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

- Advertisement -
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular