मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. गेल्यावर्षी पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली होती. त्याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतलेल्या होत्या. आता लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल,अशी आशा सर्व शिवभक्तांना लागलेली होती. मात्र अद्यापही तटबंदीच्या संवर्धनाचे काम अपूर्ण आहे.
आज छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत परत एकदा सरकारला आठवण करून दिली आहे. “मागील वर्षी पावसाळ्यात विजयदुर्गची तटबंदी ढासळली होती. त्यावेळी विजयदुर्गास प्रत्यक्ष भेट देऊन तटबंदीच्या संवर्धनासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून मंजूरी आणली होती. मात्र अद्यापही याबाबत कोणताही कार्य आदेश निघालेला नाही, ही बाब दुर्दैवी आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी तटबंदीच्या संवर्धनाचे काम पूर्ण करणे हि पुरातत्त्व विभागाची जबाबदारी आहे, अन्यथा गडाच्या तटबंदीचे अधिक नुकसान झाल्यास पुरातत्त्व विभागास शिवभक्तांच्या रोशास सामोरे जावे लागेल” असा ईशारा त्यांनी दिला.