राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात संविधानाच्या कलम 360 अन्वये आणीबाणी लागू करावी.
लॉकडाऊन करूनसुद्धा अजूनही रस्त्यांवरील गर्दी, वाढती रुग्णसंख्या, बेड, औषधं, ऑक्सिजन यांची कमतरता यांचीच चर्चा ठिकठिकाणी पाहायला मिळते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत शासकीय आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याने खासगी रुग्णालयांवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे. मात्र खासगी रुग्णालये कधी प्राणवायूचा तुटवडा, रेमडेसिविरचा तुटवडा व इतर उपचाराची कारणे सांगत कोरोना रुग्णांचा उपचाराचा खर्च वाढवत आहेत.
वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
पत्रात काय म्हटले आहे
आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनामुळे 60 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम 360 अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीतीही आशिष देशमुख यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
ताज्या बातम्यासाठी तुमचा Email Subscribe करा
सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात
करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेश (२९ हजार ५७४), दिल्ली (२८ हजार ३९५), कर्नाटक (२१ हजार ७९४)आणि केरळचा (१९ हजार ५७७) समावेश आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा मोठा वाटा आहे. ५४.७२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. तसंच २४ तासांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र (५१९) आणि दिल्लीत (२७७) झाले आहेत.