विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये रात्री उशीरा आग लागली. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.
आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.