Thursday, November 21, 2024

नव्या वर्षात मुख्यमंत्री फेलोशिप २०२३-२४ कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीत सादरीकरण

- Advertisement -

मुंबई, दि. 13 :- होतकरू तरुणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप (Chief Minister Fellowship) कार्यक्रम २०२३-२४ पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय येथे घेण्यात आला. हा कार्यक्रम लवकरात लवकर कार्यान्व‍ित व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात झालेल्या बैठकीत दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबाबत आज येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

            यापूर्वी हा कार्यक्रम २०१५ ते २०१९ दरम्यान राबविण्यात आला आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, यापूर्वी हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. यामध्ये हा कार्यक्रम पुन्हा सुरु करताना आणखी नवसंकल्पनांचा समावेश करण्यात यावा. हा कार्यक्रम लवकरात लवकर सुरु करण्याचे नियोजन करण्यात यावे. यामध्ये राज्यातील उच्चशिक्षण-संशोधनात कार्यरत संस्थांचाही सहभाग घेण्यात यावा. या योजनेमुळे उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तरुणांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कार्यक्रमात तरुण उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या उत्साहातून अनेक विकास संकल्पना गतिमान करता येतात. या योजनांमध्ये लोकाभिमुखता आणि आधुनिकता यांचा मेळ साधला जातो.

            बैठकीत उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती प्रिया खान यांनी मुख्यमंत्री फेलोशिपबाबत (Chief Minister Fellowship) सादरीकरण केले. मुख्यमंत्री फेलोशिप २०२३-२४ च्या अमंलबजावणीबाबत लवकरच सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles