Kolhapur आपण वळीवाचा पाऊस, गारांचा पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, ढगफुटीचा पाऊस असे बरेच पावसाचे प्रकार ऐकले असाल. परंतु सोन्याचा पाऊस पडणारे गाव हे बहुदा पहिल्यांदाच ऐकत असणार! यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही परंतु हे खरं आहे म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच जाणून घ्यावेसे वाटणार! चला तर मग अशाच अफलातून गावाची (Kasaba Beed) अन् सोन्याच्या पावसाची गोष्ट या लेखातून जाणून घेऊयात.
काय आहे सोन्याची पावसाची भानगड ? हे गाव नक्की कोठे आहे ?
कोल्हापूर Kolhapur जिल्ह्यातील करवीर तालुक्यात भोगावती आणि तुळशी नदीच्या बेचक्यात कसबा बीड हे छोटेसे गाव वसलेले आहे. परंतु हे गाव प्रसिद्ध आहे ते येथे पडणाऱ्या सोन्याच्या पावसासाठी. मुळात होते असे की या ठिकाणी शेतातील कामे करताना सोन्याच्या मुद्रा, दागिने शेतकऱ्यांना सापडतात. त्यामुळे इथल्या लोकांचा असा समज आहे की या ठिकाणी मृगात सोन्याचा पाऊस पडतो. परंतु ठराविक क्षेत्रातच अशी सोन्याची नाणी सापडली आहेत. कोणाला दागिने तर कोणाला सोन्याचा नाग देखील मिळाला आहे. आज कसबा बीड येथील बहुसंख्य घरातील देवघरात या ठिकाणी मिळालेली नाणी व वस्तूंचे पूजन केल्याचे दिसून येते. या सगळ्यांशी येथील ग्रामस्थांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.
HSC Result 2023 | ‘या’ तारखेला लागणार 12 वीचा निकाल
खरंच सोन्याचा पाऊस पडतो ?
सोन्याचा पाऊस पडतो की नाही हे समजून घेण्याआधी याच गावी ही नाणी अथवा सोन्याचा वस्तू का सापडतात हे पाहणे महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला किमान मागील १ हजार वर्षांच्या इतिहासाची पाने चाळावी लागतील. इसवी सनाच्या अकराव्या शतकात कोल्हापूर राज्यावर शिलाहार राजा भोज याचे राज्य होते. याच्या काळात वळीवडे येथून या ठिकाणी त्याने आपली राजधानी आणली. त्यामुळे शिलाहार राज्याच्या राजधानीचा तोरा या गावाने मिरवला होता. तसेच या ठिकाणी सापडणाऱ्या शेकडो विरगळी यांवरून येथील धारातीर्थी वीरांची ही युद्धभूमी असल्याचे देखील दिसून येते. तत्कालीन कोल्हापूर परिसरात या गावास विशेष असाधारण महत्त्व असणार. राजधानी असल्याकारणाने या ठिकाणी आर्थिक संपन्नता असणार यात मुळीच शंका घेण्याचे कारण नाही. मग या ठिकाणी अशी शेतातून नाणी का मिळतात.
या ठिकाणी मिळणाऱ्या नाण्याची वैशिष्ट्ये म्हणजे हे गाव सोडून शिलाहारांच्या राज्यातील इतर प्रमुख ठिकाणी देखील मिळत नाही. स्थानिक या नाण्याला ‘ भेंडा’ म्हणून ओळखतात. मुळात अभ्यासकांचे याबाबत असे मत आहे की राज्याच्या राज्याभिषेक व तत्सम समारंभात सुवर्णमुद्रेची उधळण केली असावी. ही ज्या ठिकाणी सापडतात. त्या परिसरात पूर्वी वसाहत होती. परंतु पुराच्या धोक्यामुळे हे गाव सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाले असावे. अन् शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे करताना ही नाणी मिळून येतात. पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात ही नाणी मिळत असल्याने भोळ्या भाबड्या स्थानिकांना सोन्याचा पाऊस पडतो असे वाटते.
कसबा बीड या गावचे शिलाहार कालखंडात अनन्यसाधारण महत्व होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरातत्वीय पुरावे सापडत असून त्यामध्ये प्रामुख्याने वीरगळ, शिलालेख, विविध मुर्त्या, नाणी आदींचा समावेश होतो. या ठिकाणी स्थानिकांनी यांचे संकलन करून मंदिर परिसरात ठेवले असून या ठिकाणी संग्रहालय उभारणे आवश्यक आहे. या दृष्टीने स्थानिक राजकीय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बीड व या परिसरातील गावे, सातेरी महादेव मंदिर सारखी धार्मिक स्थळे यांचा विकास करून ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन विकसित होऊ शकते.
– शिवप्रसाद शेवाळे, इतिहास व पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा
ही नाणी कशी असतात ?
विविध प्रकारची नाणी सापडतात. काही नाण्यांवर त्रिशूळ, हत्ती, गरुड आदींचे अंकन केलेले दिसून येते. यातील गरुड छापाचे नाणे विशेष प्रसिद्ध असून हे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.
या ठिकाणी आणखी काय पाहण्यासारखे आहे ?
कसबा बीड(Kasaba Beed) या गावास वीरगळींची खाण असे इतिहासप्रेमी म्हणतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विरगळी मिळतात. यांचे संकलन स्थानिक ग्रामस्थांनी केले असून हे याबाबतीत प्रचंड जागरूक असल्याचे दिसून येते परंतु राजकीय उदासीनता असल्याकारणाने म्हणावा तसा विकास झालेला नाही. तसेच या ठिकाणी भोजकालीन असणारे कल्लेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिराच्या परिसरात विविध ठिकाणी उपलब्ध झालेल्या विरगळी व विविध मुर्त्यांचे संकलन केले आहे. तसेच येथील नदी घाट व मंदिर देखील पाहण्यासारखे आहे.