कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा हा सातत्याने चर्चेत होता. गेले कित्येक वर्षापासून विशाळगडावर अतिक्रमण हटवा ही मोहीम राबविण्यात आली होती. संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर रविवारी विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली.
संभाजी राजे यांच्या विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला १४ जुलै रविवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी विशाळगडसह गजापुर परिसरातील मुसलमानवाडीला केंद्रित करून तोडफोड जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात शाहूवाडी पोलिसांनी संभाजी राजे यांच्यासह 500 जनांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना अटक करा अशी मागणी मुस्लिम बोर्डाच्यावतीने करण्यात आली. कोल्हापूर दसरा चौकात यासंदर्भात आंदोलन देखील झाले आहे. याठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी किल्ले विशाळगड तसेच गजापूर या भागात संचारबंदी लावली आहे. हा आदेश बुधवारपर्यंत लागू राहणार आहे.
यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार विशाळगडावर एकूण १५८ अतिक्रमणे आहेत. त्यापैकी ७० अतिक्रमणे १५ जुलै रोजी जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये ४३ अतिक्रमणे हि रहिवासी स्वरुपाची असल्याने ती पावसाळ्यात काढता येत नाहीत, ती सप्टेंबर नंतर काढणार आहेत.
शाहू महाराज यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
संभाजी राजे यांच्या आंदोलनानंतर हिंसाचाराच्या निषेधार्ह शाहू महाराज माध्यमांशी बोलताना म्हणाले,
प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेवून खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची चर्चा घडवून आणावी अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनापूर्वी दिल्या होत्या. “संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या या भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दांत तीव्र निषेध करतो. या हिंसाचारात संबंधितांवर कारवाई करावी. आणि ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने भरपाई द्यावी.”
संभाजी राजेंच्या भूमिकेबद्दल सतेज पाटील बोलताना म्हणाले, की संभाजीराजांनी भूमिका घेताना जरा विचार करून घ्यायला हवी होती. हा विषय न्यायप्रविष्ठ होता त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांच्यासोबत बसून चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे होता. जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि अतिक्रमण काढला जाईल असा विचार त्यांनी करायला हवा होता.
एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळाली. याची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.