आज देशात सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. त्यामध्ये एक वंदे भारत एक्स्प्रेस ही कोल्हापूर (vande bharat express in Kolhapur) ते पुणे या मार्गावर धावणार आहे. आज दि. 16 सप्टेंबर दुपारी 4 वाजता या गाडीचा शुभारंभ होणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळेस धावणार आहे. दुपारी सव्वाचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन पद्धतीने तर रेल्वे राज्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहून कोल्हापुरच्या शाहू महाराज टर्मिनस स्थानकातून या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोल्हापूर स्थानकावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी कोल्हापूरकर करत होते, आता ही मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापूर-पुणे हा प्रवास सुसाट होणार आहे. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यसाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे प्रयत्न आहेत असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
कोल्हापूर-पुणे या मार्गावर दि. 14 सप्टेंबर रोजी चाचणी घेतली होती ती यशस्वी संपन्न झाली. कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी 8:15 वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटणार आहे. ती 1:30 वाजता पुणे स्टेशनवर पोहोचणार आहे. तर पुण्यावरून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी ही गाडी 2:15 वाजता सुटणार आणि ती सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचणार आहे. या गाडीला जाताना 5 तास 20 मिनिटे लागणार तर येताना 5 तास 25 मिनिटे लागणार आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसचे दरपत्रक :
स्टेशन | चेअर कार | एक्झिक्युटिव्ह क्लास |
मिरज | 485 | 865 |
सांगली | 540 | 955 |
किर्लोस्करवाडी | 550 | 980 |
कराड | 590 | 1070 |
सातारा | 695 | 1280 |
पुणे | 1160 | 2005 |
वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे :
सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, कोल्हापूर