राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींमध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर पत्रकार परिषदेत आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ओळख “लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ” म्हणून केली आहे. त्यांच्या मते, ही ओळख सर्व पदापेक्षा महत्त्वाची आहे आणि त्यावर ते गर्व करतात. “मी समाधानी आहे, नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या कार्याची दिशा आणि कष्ट यावर त्यांनी आपला ठाम विश्वास व्यक्त केला. शिंदे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केले नाही. त्यांचे प्रमुख ध्येय महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणे हेच आहे. अडीच वर्षांच्या शिंदे सरकारच्या कार्यकाळात, त्यांनी महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले. महायुतीला अतिशय मोठा विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आहेत,असे ते म्हणाले. शिंदे यांच्यानुसार, विकास आणि कल्याणकारी योजनांचा समन्वय करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते, आणि यामुळेच त्यांना मोठा विजय मिळाला. “हा जनतेचा विजय आहे,” असे त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले.
पत्रकार परिषदेत शिंदे यांनी त्यांचा कार्यकाल कसा गेला यावरही भाष्य केले. “मी पहाटेपर्यंत काम करत होतो. दोन ते तीन तासांची झोप घ्यायचो. 80 ते 90 सभांमध्ये भाग घेतला. खूप मोठ्या प्रमाणात प्रवास केला,” असे ते म्हणाले. त्यांच्या शब्दांत, “मी कधीही मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला समजलो नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे.” शिंदे यांनी त्यांच्या संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही सांगितले. “मी गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मला सर्वसामान्य जनतेच्या वेदना समजतात. लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा प्रारंभ केला,” असे ते म्हणाले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकरी कल्याण, सिंचन व अन्य विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. “आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आम्ही महाराष्ट्राला ‘नंबर वन’ बनवले आहे,” असे ते गर्वाने म्हणाले.
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेसह आम्हाला मान्य आहे आणि आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेताना माझी अडचण नको, असे एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फोन करून सांगितले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे महायुतीचा सत्तास्थापनेचा आणि मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मोदी सरकारच्या समर्थनाचेही उल्लेख केले. “अमित शाह यांनी अडीच वर्षे पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभे राहिले. मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचे मी आभार मानतो,” असे शिंदे म्हणाले. निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय स्थितीचा उल्लेख करताना, शिंदे यांनी स्पष्ट केले की, “आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत आणि या निर्णयांचा मोठा प्रभाव राज्याच्या प्रगतीवर पडला आहे.” त्यांनी हे देखील सांगितले की, राज्यात महायुतीला मिळालेल्या यशामुळे, एक नवा आणि मजबूत सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्रीपदासाठी कोण होणार, यावर चर्चा सुरू असतानाच शिंदे यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते. “जोपर्यंत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.