आज माझे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त जागा निवडून आणणारे नेतृत्व ठरले तरी आजही देवेंद्रजींचे पाय जमिनीवर होते. या सगळ्या प्रवासात वाट्याला आलेला संघर्ष, अपमान आणि मिळवलेल्या विजयाचा उन्माद त्यांच्या मनाला किंचितही शिवला नाही, हे त्यांच्या देहबोलीतून क्षणोक्षणी जाणवत होते. आणि म्हणूनच हा सोहळा याची देही याची डोळा पाहताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा अभिमानाने उर भरून आला.
2014 साली पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या कामाचा आवाका किती प्रचंड आहे, याचा अनुभव खूप जवळून मी घेतला. 5 वर्षं आमदार म्हणून त्यांच्यासोबत काम करताना दक्षिणच्या जनतेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. त्यामागे प्रेरणा देवेंद्रजींची होती. राजकीय चिखलफेक कितीही झाली तरी आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून जनसेवा करत राहायची, हे देवेंद्रजींनी स्वतःच्या उदाहरणातून आणि कर्तृत्वातून शिकवलं.
2019 साली काही कारणांमुळे माझा पराभव झाला. पण तरीही न खचून जाता आलेला संघर्ष स्वीकारून ध्येयाकडे वाटचाल करत राहायची हे पुन्हा देवेंद्रजींनी शिकवलं. निवडणुकीनंतर झालेल्या अभद्र आघाडीमुळे सर्वाधिक आमदार निवडून आणून सुद्धा ते विरोधी पक्ष नेते झाले. कितीही संघर्ष वाट्याला आला तरी संयम सोडला नाही.
महाराष्ट्राच्या हितासाठी राबत राहिले. आणि कदाचित यामुळेच अश्या कठीण काळातही भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार आणि नेता त्यांची साथ सोडून बाजूला गेला नाही.
2022 ला पुन्हा सत्तेची गणितं बदलली. आणि युतीत मोठा भाऊ असूनही उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी हसतहसत स्वीकारली. इथे पुन्हा त्यांच्या पक्षनिष्ठेचा परिचय अखंड महाराष्ट्राला झाला. वरिष्ठांनी सांगितलं तर घरी बसेन पण वेगळा विचार करणार नाही, या भूमिकेतून त्यागभावनेचीही प्रचिती झाली. विरोधकांनी खिल्ली उडवली तरी देवेंद्रजींनी कधी आपल्या भाषेची पातळी सोडली नाही. ते फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करत राहिले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल डोळ्यासमोर ठेऊन पहा. देशात मोदीजींचं सरकार आलं पण महाराष्ट्रात महायुतीला अपयश आलं. आता महायुतीचं विधानसभेला काही खरं नाही अश्या चर्चा सगळ्या माध्यमातून सुरु झाल्या.. पण तरी हा पठ्ठ्या खचला नाही. अख्ख्या महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना धीर देऊन पुन्हा लढण्याचं बळ द्यायचं काम देवेंद्रजींनी केलं. आपल्या खासदारांची संख्या जरी कमी असली तरी आपला पराभव हा फक्त 0.3% मतांनी झालाय, फेक नॅरेटिव्हमुळे झालाय आणि हे सगळं सुधारून आपण पुन्हा जिंकू शकतो, हे प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला जेव्हा त्यांनी पटवून दिलं. तेव्हा कुठेतरी मलाही वाटून गेलं की, अडचणीच्या काळात सैन्याला बिथरू न देता लढायची उर्मी द्यायला सेनापतीच खंबीर लागतो.. आणि तो सेनापती देवेंद्रजींच्या रूपाने आमच्याकडे आहे.
विधानसभेच्या निवडणुका आल्या.. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार ? महायुती सत्तेतून जाणार ? युती टिकणार ? जागेवरून वाद ? अश्या असंख्य चर्चा मुद्दाम पेरल्या गेल्या. पण हा नेता तरीही डगमगला नाही. एक न एक मतदारसंघ पिंजून काढला. आणि मला मनापासून आनंद आहे की या महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आई अंबाबाईच्या आशीर्वादाने माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातून झाला. सगळ्या शक्यता, एक्झिट पोल सगळं खोटं ठरलं. आणि अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं. आज दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने मला पुन्हा आमदार केलं, आणि अखंड महाराष्ट्राने देवेंद्रजींच्या नेतृत्वाला कौल दिला. आता पुन्हा ते मुख्यमंत्री म्हणून आणि मी त्यांचा सहकारी म्हणून विधिमंडळात असू.. याहून आनंदाची गोष्ट दुसरी काय असू शकते ?
देवेंद्रजींचे अभिनंदन मी भेटूनसुद्धा करू शकतो, ते करेनच.. पण आज समाजमाध्यमावर खुलेपणाने व्यक्त होण्याचं कारण इतकंच आहे की, विरोधक आजही संभ्रम पसरवायचं काम करत आहेत. संघर्ष काय असतो ते संघर्ष करणाऱ्यालाच माहिती असतं. निकाल आणि आकडेवारी कशी आली आणि त्यामागे काय कारणं होती.. किती तपश्चर्या होती.. किती संयम होता.. हे सांगितलं पाहिजे.. जेव्हा आपण चांगल्या गोष्टीसाठी संयम ठेवतो, संघर्ष करतो तेव्हा त्या गोष्टी मांडल्याच पाहिजेत, हे मीही अनुभवातून शिकलोय. कारण जग दिखाव्याच आहे. चांगला हेतू ठेवून केलेलं काम सांगितलं नाही तर चुकीच्या गोष्टी पसरवण्यात हातखंडा असलेले लोक त्याचा नकळत फायदा घेतात, ते इथून पुढच्या काळात होऊ नये.. म्हणूनच हा लेखप्रपंच..
आज शपथविधी देवेंद्रजींचा झाला पण माझ्यासह भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्यंमत्री झाला.. ही भावना मनात येते कारण देवेंद्रजींनी स्वतःच्या वागण्यातून आम्हाला प्रेरणा देण्याचं काम केलंय.. म्हणूनच आज या लेखाच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीरपणे सांगू इच्छितो.
साहेब, आम्ही पाहिलाय काळ तुमच्या संघर्षाचा..
म्हणूनच.. आज मनापासून अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !!
– आमदार अमल महादेवराव महाडिक
https://www.facebook.com/share/p/19aXuNRvve/?mibextid=WC7FNe