Friday, July 12, 2024

‘अक्कमहादेवी’- एक मुक्त स्त्री

- Advertisement -

चैत्र शुध्द पौर्णिमा हा अक्कमहादेवीचा जन्मदिन. या औचित्याने तिच्या जीवन-विचार-कार्याचा आढावा घेणारा हा लेखनप्रपंच.

मध्ययुगीन भारतामध्ये कल्याण येथे समताधिष्ठित मानवकल्याणकारी गणसमाजाची निर्मिती झाली होती. या समग्र क्रांतीचे मुख्य शिलेदार होते क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवण्णा! या इतिहासामध्ये बसवण्णांसोबत तितक्याच आगत्याने, आदराने जे नाव येते ते म्हणजे वीरवैराग्यनिधी अक्कमहादेवी. शरण समुदायात वयाने सर्वात लहान असणाऱ्या या महादेवीस ‘अक्का’ संबोधून इतके महत थोरलेपण का बरे दिले जात असावे…?

आद्य शरणांच्या साठ वचनांना बसवण्णांची वीस वचने, बसवण्णांच्या वीस वचनांना प्रभुदेवांची दहा वचने, प्रभुदेवांच्या दहा वचनांना अजगण्णांची पाच वचने, अजगण्णांच्या पाच वचनांना कुडलचेन्नसंगय्यातील  अक्कमहादेवीचे एकच वचन सम होई पहा.

चेन्नबसवण्णा अक्कमहादेवीच्या वचनरचनेची महती गाताना वरील उद्गार काढतात. १२ व्या शतकात बसवण्णांच्या नेतृत्वाखाली झालेल्या समाजो-धार्मिक मंथनामधून तयार झालेले अमृतरूपी साहित्य म्हणजे वचनसाहित्य होय. ही वचने म्हणजे समग्र मानवमुक्तीचे गीत होत. या गीतांतील मूलतत्व आणि पूर्णत्त्व सामावलेला ‘षड्ज’ म्हणजे अक्कमहादेवीची वचन रचना होत. म्हणूनच कन्नड साहित्यविश्वातील स्त्री-शक्तीचा प्रथम आविष्कार असणाऱ्या अक्कमहादेवीला ‘आद्य कवयित्री’ चा बहुमान दिला जातो. मधुराभक्तीचा सागर आणि मानवमुक्तीचा जागर म्हणजे अक्काची वचने! याची साक्ष तिच्या आजवर उपलब्ध असणाऱ्या ४३४ वचनांपैकी प्रत्येक वाचनात मिळते. मराठी संतपरंपरेतील स्वतःला नाम्याची दासी संबोधणारी ‘संतकवयत्री जनाबाई’ आणि १६ व्या शतकात उत्तर भारतामधील ‘कृष्णभक्त मीराबाई’ यांच्यात आणि अक्कमहादेवीच्या जीवन काव्यात बरीच साम्यस्थळे आढळतात. अध्यात्मिक जीवनातील दिव्य प्रेमभावना म्हणजे ‘मधुराभक्ती’ होय. हीच मधुराभक्ती अक्कमहादेवी च्या अद्वितीय काव्यप्रतिभेची प्रेरणा आहे. ‘शरण सती लिंग पती’ हे ब्रीद मनाशी बाळगून अक्कमहादेवी आपल्या लिंगांग सामरस्याच्या प्रवासास सुरूवात करते. या यात्रेत ती ‘चेन्नमल्लिकार्जुनाला’ म्हणजेच चराचरामध्ये साचलेल्या चैतन्यरुपी शिव तत्त्वाला ती आपला पती मानते. त्याच्या प्रेमवर्षावात ती सर्वांग न्हाऊन ओलेचिंब होते म्हणूनच ‘चेन्नमल्लिकार्जुनराया’ हे तिचे वचनांकित सार्थ ठरते!अक्कमहादेवीचे बोलणे, वागणे, हिंडणे, फिरणे, वावरणे असे सगळे जगणेच लोकविलक्षण आहे. सामाजिक, धार्मिक, साहित्यिक बंडखोरी करत तिने आपला स्वतंत्र जीवनपथ निर्माण केला. तिचे प्रत्येक चिंतन स्वातंत्र्य व मुक्तीची प्रेरणा असणारे शिवचिंतन ठरते. अक्कमहादेवी आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवला परमत्त्वाशी जोडून शिवानुभवाचे कथन आपल्या वचनांतून करते. म्हणूनच तिचा संघर्षमय जीवन प्रवास जाणून घेणे हे तिचे विचार-कार्य समजण्यासाठी महत्त्वाचे ठरते.12 व्या शतकामध्ये कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील उडतडी (सध्याचे उडगणी) या गावी महादेवीचा जन्म झाला. निर्मलशेट्टी आणि सुमती हे शिवभक्त दाम्पत्य म्हणजे महादेवीचे माता-पिता होत. बालवयातच जडलेल्या भक्तीरुचिमुळे गावाशेजारील गुरूलिंगदेवांचा मठ तिला सदोदित साद घालत असे. लिंगायत तत्वाचे प्रचारक असणारे जंगम त्या मठामध्ये वचनाची शिदोरी घरून येत. येथेच महादेवीस वचन अभ्यासाची, चिंतनाची सवय जडत गेली. उपजत काव्य प्रतिभेची देन लाभलेल्या अक्कमहादेवीस वचन काव्यातून नवचैतन्य मिळू लागले. बसवादी शरणांच्या वचनांतून प्रतिध्वनीत होणाऱ्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाच्या विचाराने महादेवीच्या कवीमनाला मानवमुक्तीच्या आकाशात स्वच्छंद विहार करण्याचे सामर्थ्य मिळाले. महादेवीने बालवयातच गुरूलिंगदेवांकडून इष्टलिंग दीक्षा घेऊन लिंगायत तत्वज्ञानानुरूप लिंगांग सामरस्याच्या पथावर मार्गक्रमण करण्याचे ठरविले. या जीवन प्रवासाचे एकमेव साध्य आणि साधन म्हणून महादेवीने निवडले ते ‘चेन्नमल्लिकार्जुनाला’ अर्थात प्रत्यक्ष परशिवास!अक्कमहादेवी ही जणू अलौकिक सौंदर्याची खाणच होती! बालवयातून यौवनात पदार्पण करत असताना तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. एकदा तिच्या या सौंदर्यावर मोहित होऊन स्थानिक राजा कौशिक तिला आपली पत्नी(?) छे! पत्नी नव्हे तर शय्यासोबती करण्यासाठी हट्टाला पेटला. पण, आक्का या राजाज्ञेला नकार देते. पुढे जाऊन तो कामांध राजा आपल्या इच्छापूर्तीसाठी महादेवीच्या आई-वडिलांना त्रास देऊ लागला. राजाने आईवडिलांना जिवेमारण्याची धमकी दिल्याने अखेरीस हतबल होऊन महादेवी राजाशी विवाह करण्यास तयार होते. परंतु राजाला तीन अटी घालते. त्या अशा,1. महादेवीच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श करणार नाही.2. महादेवीच्या अध्यात्म साधनेत व्यत्यय आणणार नाही.3. राजाने भौतिक भोगविलास त्यागून भक्तीसाधनेकडे वळावे.जर या अटींचा भंग झाला तर तत्क्षण राजवाडा सोडून बाहेर पडेन, असा निर्देश करून महादेवी कौशिकाच्या राजवाड्यात प्रवेशते. वासनांध राजा जास्त वेळ संयम बाळगू शकत नाही आणि एके दिवशी महादेवी लिंगार्चना करीत असताना तिच्या पदराला स्पर्श करतो. आक्का राजाला प्रश्न करते,

Table of Contents

“हाताने अंगावरील पातळ धरू शकतोस, पण अंगावरील काया धरणे साध्य आहे ?अंगावरील वस्त्रे-आभरणे ओढून काढू शकतोस, म्हणून शरीरातील निर्वाण ओढणे साध्य आहे? चेन्नमल्लिकार्जुनाचे वस्त्र अंगावर असता,अरे वेड्या, मला लौकिक वस्त्राची काय पर्वा”

यामुळे राजा शरमेने चुर होतो. महादेवी आपल्या अटींचे उल्लंघन झाले म्हणून नेसलेल वस्त्र देखील धुडकावून दिगंबर अवस्थेतच गृहत्याग करते.राजा कौशिक हा पुरुषसत्तेच्या बळावर स्त्री जीवनाची होळी करणाऱ्या तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याच्यावर अक्कमहादेवीने घातलेल्या अटी म्हणजे स्त्रीला निसर्गदत्त लाभलेल्या नकार स्वातंत्र्याची पावती होत. आजच्या 21 व्या शतकातील देखील अनेक स्त्रिया हा नकार धैर्याने समाजासमोर मांडताना कचरतात. त्या सर्वांकरिता आक्का एक मशाल आहे. पुरुषप्रधानतेच्या पिंजऱ्यातील विवाहसंस्थेच्या सुवर्ण बेड्या तोडणे तर लांबच नाकारणे देखील कल्पनातीत होते. अश्या काळात अनिच्छेने लादलेले विवाह बंध तोडून टाकण्याचे अपूर्व धाडस महादेवीने केले. आपल्या अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या रक्षणार्थ तिने केलेला पती आणि संपत्तीचा धिक्कार विलक्षण आहे. आक्काची ही बंडखोरी प्रत्येक स्त्रीमुक्तीवादी, स्त्रीपुरुष समतावादी आंदोलनासाठी अखंड प्रेरणा देणारी आहे.राजवैभवाची सर्व बंधने लाथाडून महादेवी प्रस्थान करते ती कल्याणकडे. उडगणीहुन कल्याण (बसवकल्याण) सुमारे 700 किमी दूर आहे, हा प्रवास नुकतेच यौवनात पदार्पण केलेल्या नवयुवतीस एकट्याने करणे निश्चितच सुलभ, सहजसाध्य नव्हता. रानावनामध्ये पोटाची भूक भागवण्यासाठी सावजाच्या प्रतीक्षेत असणारी हिंस्र श्वापदे आणि नगर वस्तीमध्ये इंद्रियांची भूक भागवण्यासाठी कामातुर नजरेने टपून बसलेले नरपशु या दिव्यातून महादेवी अतिशय धैर्याने चालत राहते. ती लिहिते,

भूक लागली तर,गावात भिक्षान्न मिळे. तहानता, असती विहिरी, झरे नि तळे. थंडी झोंबता, टाकून दिलेली वस्त्रे असती. विसावण्या पडकी देवळे आसरा देती.रे चेन्नमल्लिकार्जुनराया,सोबती माझ्या तू असशी आत्मसांगाती.

अश्याप्रकारे ध्येयाप्राप्तीच्या अढळ निष्ठेपायी अपार यातना हसतमुख सहन करीत अखेरिस महादेवी कल्याण नगरीत पाऊल ठेवते. हो ! हे तेच कल्याण ! बसव कल्याण ! जिथे बसवण्णांनी ‘लिंगायत’ नामक भक्ती चवळीच्या माध्यमातून धर्म, अर्थ, समाज, साहित्य अशी समग्र क्रांती घडवून आणण्याचे कार्य आरंभिले होते. जिथे समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, विवेक, अहिंसा या मानवीय मूल्यांची जोपासना करणाऱ्या समाज व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये सकल श्रमजीवी शरणगण वर्ण-वर्ग-लिंगभेद त्याजून एकदिलाने नांदत होते. कल्याण मधील अनुभव मंटपाचे सदस्यत्व पत्करून शरणकुटुंबातील लेक बनण्याच्या विचाराने महादेवीचा उर हर्षभरीत होतो. महादेवी कल्याणमध्ये प्रवेशिल्याचे समजताच शरण किन्नरी बोम्मय्या अल्लमप्रभूंच्या सांगण्यावरून तिची परीक्षा घेण्यासाठी जातो. नगराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या ‘बंदवर ओणी’ या ठिकाणी बोम्मय्या महादेवीस भेटून तिच्या वैराग्याची परीक्षा घेतो. तिच्यासोबतच्या संभाषणातून महादेवीच्या वैराग्यतेजाने स्तिमित होतो व तिला शरण जातो. पुढे बंधू प्रेमासहीत महादेवीला अनुभवमंटपामध्ये घेऊन येतो. महादेवीच्या किर्तीमुळे सर्व शरणगण तिची आतुरतेने वाट पहात असतात. महादेवी तेथे प्रवेशीताच विनम्रतेने सकल शरणांना ‘शरनु शरणार्थी’ करते. तोच तिला अल्लमप्रभूंच्या ज्ञान-वैराग्याच्या पुढील कसोटीस सामोरे जावे लागते. प्रभुदेव तिला विचारतात; साधनेद्वारे अंग-मन-भाव शून्य झाले असताना, कामावर नियंत्रण साधून साक्षात परशिवास आपला देह अर्पिला असता, या शरीरावर केशसंभाराचे आवरण तरी कश्यासाठी ? यावर महादेवी उत्तरते;

सालीचा रंग न बदले फळ पिकल्याविना,बघूनी काममुद्रा होतील तुम्हां वेदना;या भावे झाकले मम शरीर.बांधवांनो, छळू नका मज,चेन्नमल्लिकार्जुन देवाच्या अधीन झाले मी.

अल्लमप्रभूंच्या अशा प्रखर प्रश्नांस महादेवीने आपल्या ज्ञानतेजाच्या सामर्थ्याने दिपून टाकल्याचे पहाताच सर्व शरण समुदाय थक्क होतो. ”गुहेश्वरलिंगाठायी जाहली भेदभावरहित हो, अक्कमहादेवीच्या श्रीचरणी नामो नमो!” असे म्हणत, अल्लमप्रभु तिची स्तुती करतात. ”कूडलसंगमदेवा, ऐशी अक्कमहादेवी जननी माझी !” असे म्हणत, बसवण्णा अक्कमहादेवीचा यथार्थ गौरव करतात. पुढे सर्व शरण समुदायाची थोरली बहीण म्हणजेच ‘अक्का’ बनून अक्कमहादेवी या माहेरात लेकीच्या रूपाने नांदू लागते.कल्याणमधील वास्तव्यात अक्कमहादेवी आपल्या आत्मोन्नती सोबतच समाजोद्धाराच्या महत कार्यात आपला सहभाग नोंदवते. नित्य अनुभावचर्चेतील वचन चिंतनातून अक्कमहादेवी मधील वचनकार कवयित्रीस नवनवीन क्षितिजे गवसू लागतात. भक्ती आणि प्रेमाच्या सहजसुंदर अभिव्यक्ती सोबतच तिच्या वचनातून समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा, कर्मकांड, जाती-लिंग-वर्ग भेद, वेद-शब्द प्रामाण्यवाद याविरुद्ध कठोर प्रहार करते. अक्का आपल्या जीवनसंघर्षातून आणि विचारविमर्षातून स्रीदास्यविमोचनासाठी रणशिंग फुंकते. तिच्या प्रेरणेतूनच तिच्यासह एकूण ३५ शिवशरणी जीवनाचे तत्वज्ञान वचनांच्या रूपामध्ये मांडू लागतात. बसवभगिनी अक्कनागाई, बसवपत्नी नीलांबिका, वीर दान्नम्मा, स्वच्छतेचा कायक करणारी शरणी सत्यक्का, गणिका(वेश्या) संकव्वे इत्यादी शरणी वचन रचनेच्या माध्यमातून स्त्री मुक्तीचे गीत गाऊ लागतात या गटाच्या प्रमुख नेत्या म्हणजे अक्कमहादेवी होत. तत्कालीन वैदिक व्यवस्थेमधील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री वर्गाची अवस्था अत्यंतिक हीन झाली होती. स्त्रीचे सर्व मानव अधिकार काढून घेऊन तिला पशूपेक्षाही खालच्या दर्जाने वागविले जात होते. स्त्री शूद्र, राक्षसी, अपवित्र, मोक्ष मार्गातील धोंड आहे अशा अतार्किक समजुतीमुळे ती केवळ उपभोगाचे सर्वमान्य साधन बनली होती. धर्माने स्त्रीला तिच्या निसर्गधर्मामुळेच (मासिक पाळी) शूद्र, अपवित्र ठरवून स्त्रियांना व पुरुषांना वेगळे धर्मसंस्कार नेमले होते; ते आजही आहेत हे तर आपण पाहतोच. बसवपूर्व काळात देखील स्त्रीपुरुष समतेची मांडणी झाल्याचे आपण जाणतोच परंतु बसवकाळात याविषयी झालेली क्रांती ही अपूर्व व युगप्रवर्तक होती. अक्का म्हणते,

“नारीचे नारी असणे पुरुषासाठी सुतक;पुरुषाचे पुरुष असणे नारीसाठी सुतक.सुतक मिटले जर मनाचे, उरे का सुतक तनाचे ?देवराया, मुळी नसलेल्या सुतकाचेसाऱ्या जगाला खूळ लागले.स्वामी चेन्नमल्लिकार्जुन नामेसर्वोत्तमसाठी अवघे जगतनारीमय बनले पहा.”

स्त्री-पुरुषांमध्ये निसर्गतः असणारे शरीरभेद वगळता दोघेही समान आहेत. स्त्री आणि पुरुषांना समान धार्मिक इतकेच काय साहित्यिक-सांस्कृतिक-आर्थिक-राजकीय देखील अधिकार देऊ केले.समाजातील शोषक वर्गावरील अन्याय, अत्याचाराचे मूळ ठरणाऱ्या धर्मग्रंथांविषयीची बंडखोरी अक्का आपल्या वचनांतून तर्क सुसंगत मांडते.
वेद, शास्त्र, आगम, पुराण, सत्व नाही त्यात खासा;जैसे कंदिल्यावरील धान, पहा उरतो मागे कणी, भुसा.कश्यासाठी ते कांडावे अन् कश्यासाठी ते पाखडावे…?
‘प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमींना जातपात शोधण्या अवसर कोठून ?’ असा प्रश्न विचारत जाती-पातीच्या बंधिस्त वाड्यांवर अक्का प्रहार करते. यावरून अक्कमहादेवीची कविता ही भारतीय स्त्री परंपरेतील क्रांतिकारी चैतन्यशक्तीचा प्रथम आविष्कार होता असेच म्हणावे लागेल.या सामाजिक विचारांसोबतच नैतिक उद्बोधन देखील अक्का आपल्या वचनांतून देते. ती म्हणते,

घर केले जर गिरीवरती, बाळगावी का पशूंची भीती ?घर केले जर सगरतटी, बाळगावी का लाटांची भीती ?घर केले जर भर मंडईत, कोलहालाने का व्हावे लज्जित ?ऐक बा चेन्नमल्लिकार्जुना, जन्मल्यावरी या जगती, येता जरी निंदा नि स्तुती,मनी न होता कोपायमान, चित्ती असो द्यावे समाधान.अतिशय समर्पक उपमा वापरून अक्का या वचनातून जीवनाकडे आशादायी दृष्टिकोनातून पाहण्याचे सामर्थ्य सहजतेने देते. 

ज्ञान असे भानुपरी, भक्ती भानुकिरणांपरी.किरण नसती भानुविना, भानू नसे किरणांविना.मग ज्ञानाविन भक्ती अन् भक्तीविना ज्ञानकसे असू शकेल, चेन्नमल्लिकार्जुना ?

अशा प्रकारे, गहिरे तत्त्वचिंतन करीत अक्कमहादेवी बसवण्णा आणि अल्लमप्रभूंच्या मार्गदर्शनानुसार षटस्थल साधनेद्वारे अध्यात्मसाधनेतील उन्नत स्थितीला जाऊन पोहचते. आणि पुन्हा एकदा अक्का जीवशिव ऐक्याच्या ओढीने चेन्नमल्लिकार्जुनाच्या भेटीसाठी निघते. अतिशय सदगदीत अंतःकरणाने सर्व शरणांचा निरोप घेऊन अक्का कदळीबनाकडे मार्गस्थ होते. पुढे कल्याण ते कदळीबन (श्रीशैल्य) हा प्रवास परमानंद प्राप्तीचा प्रवास होय. उडतडीहुन निघून पुढे कल्याण नगरीतील शरण संकुलातील अल्प वास्तव्य वगळल्यास अक्काचे बहुतेक सगळं आयुष्य रानावनात एकटीने भटकण्यात गेले. तर उत्तरायुष्य तिने श्रीशैलावरच्या कदळीबनात काढले. या संपूर्ण प्रवासात तिने पशुपक्षी, वृक्षवल्ली सोबत संवाद साधला. हे पहा अक्का विचारते, 
मधुर सुस्वर बोल पढणाऱ्या पोपटांनोदेखिला का तुम्ही मम सखा ?पंचम स्वरात, मंजुळ तान देत कुजणाऱ्या कोकिळांनोदेखिला का तुम्ही मम सखा ?…………..गिरी-गुंफांतरी नर्तन करणाऱ्या मयुरांनो,देखिला का तुम्ही मम सखा ?विनविते तुम्हां, सांगा ना, मज सांगा हो,आहे तरी कोठे, माझा चेन्नमल्लिकार्जुन सखा ?
निसर्गाप्रति असणारे हे उत्कट स्नेह तिच्या प्रत्येक वचनांतून दिसून येते. हे वचन पहा, 

नारिंग, लिंबू, कैरी, महाळुंगसीआंबट जल सिंचिले कोणी ?ऊस, केळी, फणस, नारळासीमधुर जल सिंचिले कोणी ?भात, राजान्न, शाल्यन्नासीरुचिरोदक सिंचिले कोणी ?मरवा, मोगरा आणिककोवळ्या नागरमोथ्यासीपरिमळोदक सिंचिले कोणी ?असे जल एकचि, भूमी एकचिअन् आकाशही तेचि.ऐसे एकचि जलनाना द्रव्ये सामावुनीभिन्न भिन्न होतसे,तैसे माझा देव चेन्नमल्लिकार्जुननाना जगत सामावून घेतसे,तरीही आपल्यापरीनिराळाच असे.

अशा प्रकारे, स्वतः निसर्ग होऊन प्रकटलेल्या परशिवाशी तिचा असणारा संग पदोपदी वाढत जाऊन ऐक्यात सामाविला. म्हणूनच साऱ्या निसर्गातून झालेल्या ईश्वरीय साक्षात्काराचा दिव्य स्वर तिच्या वचनांमधून ऐकू येतो. 

प्रभू, तूच असशी रे वन सारे,वनातील सारे देवतरु तूच रे, वृक्षराजीत विहरणारे खग-मृग सारे तूच रे.ऐसे सर्वभरीत असशी….

असे म्हणत पिंडांड-ब्रम्हांड अर्थात अंग-लिंगातील द्वैत नष्ट होत अद्वैताचा साक्षात्कार अक्काला या निसर्गवासातूनच झाला असावा. याच निसर्गवासात कदळीच्या घनदाट वनातील गुंफेत अक्का आपल्या करस्थली इष्टलिंग घेऊन त्याकडे अनिमिष दृष्टीने पहात लिंगांग सामरस्य पावते. अशा प्रकारे, जीव-शिव ऐक्य या केंद्राभोवती विस्तारलेला असीम असा अक्काच्या जीवनाचा परीघ तिच्या जीवनातील प्रत्येक पावलागणिक केंद्राकडे जाऊ लागतो. या प्रत्येक संक्रमणात तो तेजोमय ज्ञानपुंज विखुरत जातो. हे ज्ञानपुंजाचे पथदर्शक होऊन आत्मोन्नत्तिसह समाजोन्नती साधणाऱ्या प्रत्येक यात्रीस दिशा देत राहतील.
शरणू शरणार्थी !

[ टीप : सदर लेखामध्ये वापरलेली अनुवादित वचने ही खालील पुस्तकांतून घेतली आहेत.1. चेन्नमल्लिकार्जुनराय…. (अक्कमहादेवीच्या वचनांचा भावानुवाद ) – शिवानंद.2. शिवशरणींची वचने, मूळ कन्नड : डॉ. वीरण्णा राजूर, अनुवाद : प्रा. आर. एम. करडीगुद्दी. ]
-यश आंबोळे, कोल्हापूर (विद्यार्थी, भौतिकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)amboleyash322@gmail.com 9579307321

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles