खा. धनंजय महाडिक यांच्या पाठबळामुळेच अनगर अप्पर तहसिल रद्द – उमेश पाटील

0
25

अनगर येथील अप्पर तहसील रद्द करण्याच्या न्यायालयीन लढाईत भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या ऍडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी महाशिवरात्र निमित्त मोहोळ येथे श्रीनागनाथ मंदिरात दर्शन घेतले. ऐतिहासिक निकालाची प्रत मोहोळचे जागृत देवस्थान सिद्धनागेशाच्या चरणी अर्पण करत यापुढे देखील अनगर अप्पर तहसील प्रकरणी न्यायालयीन लढ्यात सक्रिय राहण्याची भूमिका व्यक्त केली. 

            राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत भीमा परिवाराच्या वतीने ऍडव्होकेट वृषाली मैंदाड यांचा सन्मान करण्यात आला व त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. “मोहोळकरांच्या स्वाभिमानाचा हा लढा होता, मोहोळच्या जनतेने रस्त्यावर हि लढाई यशस्वीपणे लढत असताना न्यायालयात मला प्रतिनिधित्व करता आलं आणि  आपल्याला हि लढाई जिंकता आली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. या संपूर्ण न्यायालयीन लढाईत ज्यांनी आम्हाला खंबीर पाठबळ दिलं आणि मार्गदर्शन केलं असे आपले राज्यसभा खासदार धनंजय महाडिक साहेबांचे मी विशेष आभार मानते. अनगर अप्पर तहसील रद्द करण्याच्या लढ्यात मोहोळ तालुक्यातील जनता, आंदोलक, नेते, उपोषणकर्ते यांच्यासह खासदार महाडीक साहेबांच योगदान अतिशय महत्वपूर्ण राहीलं आहे.”

         दरम्यान जुलै 2024 मध्ये अनगरसह 43 गावांचा समावेश करत अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले होते. मात्र जनतेच्या दृष्टीने ते अडचणीचे असल्याने अनगर अप्पर तहसील कार्यालयास विरोध सुरु झाला होता. आणि अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी जनतेत जोर धरत होती.

            भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी उपोषण स्थळी भेट देत मोहोळच्या जनतेवर अन्याय नाही झाला पाहिजे. त्यामुळं अनगर अप्पर तहसील रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल आणि त्यासाठी लागेल ती सर्व मदत देऊ असा शब्द दिला होता. ऍडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी ऑगस्ट २०२४ च्या पहिल्या आठवड्यात खासदार धनंजय महाडिक यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत संपूर्ण रणनीती तयार केली. ठरलेल्या रणनीती नुसार 5 सप्टेंबर 2024 रोजी संतोष पाटील यांचे नावे जनहित याचिका दाखल केली. अनगर अप्पर तहसील प्रकरणी संतोष पाटील व सोमेश क्षिरसागर यांच्या एकूण २ जनहित याचिका आणि इतर एकूण ६ रिट पीटिशन दाखल करण्यात आल्या होत्या.

          महाराष्ट्र महसूल अधिनियम सेक्शन 4 अंतर्गत अनगर अप्पर तहसील मंजुरी प्रक्रिया कशाप्रकारे चुकीची आहे हे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, माननीय न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी अनगर अप्पर तहसील कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला.

            “हा निर्णय ऐतिहासिक आहे कारण देशात आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच माननीय न्यायालयाने अशा प्रकारे मंजूर तहसील रद्द करण्याबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात जर अनगर अप्पर तहसील प्रकरणी जो प्रसंग निर्माण झाला तसाच प्रसंग निर्माण झाल्यास हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे. हा लढा यशस्वी झाल्याने मोहोळचा मापदंड तयार झाला म्हणल्यास वावग ठरणार नाही.” अशी भूमिका ऍडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी मांडली. 

           अनगर अप्पर तहसिल रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते व सर्व तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींनी खा. धनंजय महाडिक यांना फोन करून न्यायालयीन लढाईचा आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. त्यावेळी खासदार महाडिक यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्याचा शब्द दिला होता. अनगर अप्पर तहसील रद्द करण्याची न्यायालयीन लढाई यशस्वी करत खासदार साहेबांनी दिलेला शब्द पाळला.

   – उमेश पाटील

                           

—————————————————

            मोहोळवर खासदार महाडिक साहेबांचं विशेष प्रेम आहे त्यामुळेच एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे खासदार महाडिक साहेबांनी अनगर अप्पर तहसील मंजुरी प्रक्रियेतील त्रुटींचा अभ्यास करून त्याच्या काही नोंदी आम्हाला दिल्या होत्या ज्या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरल्या.
 - ऍडव्होकेट वृषाली मैंदाड