पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याच कारणामुळे केंद्रीय पातळीवरील राजकारण बदलण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी करण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे.
काँग्रेस राज्य कार्यकरणीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत घोषणा केली आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, राज्यातील प्रत्येक निवडणूक ही काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. सत्ता स्थापन करतानाच काँग्रेसने सांगितले होते की, विधानसभा आणि मुंबई पालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. (Congress will contest the upcoming elections on its own – Nana Patole)
राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आले आहेत. परंतु या महाविकास आघाडील काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा आणि मुंबई पालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस पक्षाच्या ऑनलाईन बैठकीत पटोले यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्षांनी तडजोड करत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. परंतु आता स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे सत्तेत असलेले पक्ष निवडणूकीत एकमेकांविरोधात उभे राहताना दिसणार आहेत.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी देखील काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी एकवटलेले हे तीन पक्ष निवडणूक आल्यास पुन्हा एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील. महाराष्ट्रात काँग्रेसला २०१४ च्या निवडणूकीनंततर उतरती कळा लागली आहे. देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीमध्ये खराब प्रदर्शनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम केरळमध्ये काँग्रेसला पाहिजे तसं यश मिळाले नाही तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची स्थिती अतिशय बिकट झाल्याची दिसते आहे.