काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ Chhava movie या चित्रपटाच्या टीझरला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या टीझरमधील एका दृश्यावरून काहींनी आक्षेप घेतला. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत मराठा संघटनांनी चित्रपटावर टीका केली. राज्य सरकारनेही या वादावर लक्ष घालत या दृश्यावर आक्षेप घेतला.
यावर, राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी आज (सोमवार) सकाळी घोषणा करत वादग्रस्त दृश्य चित्रपटातून काढण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चित्रपटात महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरेंचे मार्गदर्शन आणि निर्णय | Chhava movie
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले की, “राज ठाकरे यांचे ऐतिहासिक संदर्भांवरील वाचन खूप व्यापक आहे. चित्रपटात काय समाविष्ट करावे आणि काय टाळावे याबाबत त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”
ते पुढे म्हणाले, “ Chhava movie चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचे दृश्य आम्ही हटवणार आहोत. राज ठाकरेंनीही याच सल्ल्याचा पुनरुच्चार केला. आमचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, जर कोणाला असे वाटत असेल की छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर झाली आहे, तर आम्ही तो सीन काढून टाकू. कारण तो चित्रपटाच्या कथेसाठी फारसा महत्त्वाचा भाग नाही.”
वाद नेमका काय होता?
विकी कौशल यांनी ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये एका गाण्यात महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आले होते, ज्यावर मराठा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मागणी केली होती की, हा ट्रेलर तातडीने हटवावा, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी संघटनांशी चर्चा करावी.
शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा आणि चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली होती.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या निर्णयामुळे चित्रपटावरील वाद शांत होण्याची शक्यता आहे.