18.5 C
New York
Tuesday, April 16, 2024

Buy now

spot_img

CORONA | महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये वाढला कोरोना संसर्ग? पालकांमध्ये भीतीचे वातावरण

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात 18 वर्षाखालील 8.5 टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलांमध्ये इतर वयोगटाच्या तूलनेत मृत्यूदर फार कमी आहे. मात्र, लहान मुलांना गंभीर आजार झाल्याच्या केसेस आढळून आल्या आहेत.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट केलं. देशातील कोरोना हॉटस्पॉट 10 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील 8 जिल्हे आहेत. एकट्या मार्च महिन्यातच महाराष्ट्रात तब्बल 6 लाख 18 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.

कोरोना संसर्ग राज्यभरात झपाट्याने पसरतोय. महाराष्ट्रात कोव्हिड-19 व्हायरसमध्ये दोन म्युटेशन (बदल) आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयाने मान्य केलंय. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असल्याचं दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, संसर्गजन्य आजारात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना थैमान घालताना पहायला मिळतोय.

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये वाढला कोरोना संसर्ग?

महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त झाली. सद्य स्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या 60 टक्के केसेस एकट्या महाराष्ट्रात आढळून येत आहेत.तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवा आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांसोबत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त आढळून आलंय.

शून्य ते 10 वयोगटातील रुग्णसंख्या

 • 1 मार्चला राज्यात शून्य ते 10 वयोगटातील 71,908 मुलं कोरोनाबाधित होती.
 • 31 मार्चला शून्य ते 10 वयोगटातील कोरोनाग्रस्त मुलांचा आकडा 87,105 वर जाऊन पोहोचला.
 • महिनाभरात कोरोनाग्रस्त लहान मुलांची संख्या 15,197 ने वाढली.

(रिपोर्ट- वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग)

11 ते 20 वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या

 • 1 मार्चला 11 ते 20 वयोगटात 1 लाख 43 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली होती.
 • 31 मार्चला हा आकडा वाढून 1 लाख 82 हजारावर जाऊन पोहोचला.

(रिपोर्ट- वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग)

 • वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात राज्यात कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 6 लाख रुग्णांपैकी 15,197 लहान मुलं आहेत.
 • शून्य ते 20 वयोगटातील मुलं एकूण रुग्णसंख्येच्या 10 टक्के आहेत.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,

 • 30 मार्च 2021 पर्यंत मुंबईत शून्य ते 10 वयोगटातील 6706 तर, 11 ते 20 वयोगटातील 16,431 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
 • शून्य ते 10 वयोगटातील 17 तर 11 ते 20 वयोगटातील 32 मुलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत फरक काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमध्ये दोन म्युटेशन (बदल) झाल्याची माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, म्युटेट झालेला व्हायरस रोगप्रतिकारशक्तीला चकमा देतोय. त्यामुळे संसर्ग जास्त प्रमाणात पसरतोय. लहान मुलांमध्ये संसर्गाला हे कारण आहे?

यावर बोलताना डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2 टक्के मुलं पॉझिटिव्ह येत होती. आता ही संख्या 10 टक्क्यांपर्यंत पोहोचलीये. याचं एक कारण व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन असू शकतं. यूकेमध्ये झालेल्या अभ्यासात कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होत असल्याचं समोर आलं होतं.”

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर फार कमी आहे. मृत्यूदर कमी असणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

“हवामान बदल झाला की लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप येणं सामान्य आहे. मात्र, आता लहान मुलांच्या ओपीडीमध्ये रुग्ण आला की त्याला कोव्हिड टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत,” असं डॉ. वानखेडकर सांगतात.

फोर्टिस रुग्णालयाच्या चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. जेसल सेठ सांगतात, “2020 च्या तूलनेत गेल्या 15 दिवसात लहान मुलांमध्ये संसर्ग खूप जास्त आहे. काहीवेळा मुलांना संसर्ग होतो आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला आजार होतो. एक चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांना व्हायरसमुळे गंभीर आजार होत नाहीये.”

10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षांचा सध्या पुनर्विचार नाही – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

या परीक्षांविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “यावर्षी परिस्थिती वेगळी आहे, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून जास्तीत जास्त टेन्शन फ्री वातावरणात परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे.

या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल झाल्यानंतर तिसरी पुरवणी परीक्षाही घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. यामध्ये विद्यार्थ्यांना नापास झालेल्या विषयांचे पेपर देता येतील आणि श्रेणीवर्धन करायची संधी मिळेल.

जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असतील, त्यांच्या घरचे कोरोना पॉझिटिव्ह असतील किंवा ते कंन्टेमेंट झोनमध्ये राहत असतील किंवा त्यांच्या भागात लॉकडाऊन लागू असेल तर त्यांना जूनमध्ये परीक्षा देण्याची संधी मिळेल.

पण विद्यार्थांना कोरोना झाला तर त्याला जबाबदार कोण? असं विचारल्यानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या, “याचं उत्तर मी देऊ शकत नाही. पण आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. सरकार म्हणून मुलांची सुरक्षित परीक्षा घेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे.”बोर्डाची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. याविषयी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेपेक्षा सर्व मुलांचा आम्ही विचार केला. गावातल्या मुलांचं परीक्षा देताना इंटरनेट कनेक्शन गेलं तर काय करणार? CBSE, ICSE ही बोर्डही त्याच काळात परीक्षा घेत आहेत. आम्ही परीक्षा घेत असलो तरी आमची प्राथमिकता विद्यार्थ्यांचं आरोग्य आहे.”

दहावी – बारावीची परीक्षा कधी होणार ?

 • दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान होईल.
 • बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होईल.
 • लेखी परीक्षेनंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.
 • 22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.
 • दहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत वा कॉलेजमध्ये ही परीक्षा देण्यात येईल. त्या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरण्यात येतील.

शिवाय या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

तर या परीक्षांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतचे पालक यांचं हॉलतिकीट पाहून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

पेपर लिहायला जास्त वेळ

गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जास्त झालेला नाही. हे लक्षात घेत पेपर लिहीण्यासाठीची वेळ वाढवण्यात येत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.

यानुसार :

 • 40 ते 50 मार्कांच्या पेपरसाठी 15 मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल.
 • विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा जास्त वेळ देण्यात येईल. पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल.
 • दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी 1 तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल.

Team LJ
Team LJhttps://livejanmat.com/
The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles