दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातील माहिती दिली. त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे आणि राज्य सरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस मोफत देण्याच्या निर्णयावर विचार सुरू असतानाच राष्ट्रवादीने घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “नागरिकांना मोफत लस मिळायला हवी याबाबत सोनिया गांधी आग्रही आहेत. कॉंग्रेसचं हेच धोरण आहे. आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. हा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. तो त्यांचा अधिकार आहे. पण काही लोकं आपल्या पक्षाला श्रेय मिळण्यासाठी निर्णय आधीच जाहीर करत आहेत. हे योग्य नाही.
आदित्य ठाकरे यांनी मोफत लशीबद्दल केलेले ट्वीट काही वेळातचं ‘डिलीट’ करण्यात आलं. हे ट्वीट डिलीट केल्यानंतर विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.
राज्य सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय अद्याप घेतलेला नाहीये का? मुख्यमंत्र्यांच्या आधी हा निर्णय जाहीर करण्याची नेत्यांनी घाई केली का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.