महाराष्ट्राची मोठी मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मागणी केली होती.
मुंबईतील हाफकिन संस्थेला कोव्हॅक्सिन लशीचं उत्पादन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.
हाफकिनमध्ये भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन लस बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने गुरुवारी (15 एप्रिल) मान्यता दिली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र पाठवलं. वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हाफकिनमध्ये कोव्हॅक्सिन लस बनवण्याची परवानगी एका वर्षाकरिता दिली जात आहे. सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लसीकरण वेगाने करण्याची गरज आहे. त्यामुळे हाफकिनमध्ये लवकरच लशीचं उत्पादन सुरू करावं. लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात यावी, असं केंद्र सरकारने राज्याला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हाफकिनमध्ये लसनिर्मितीची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे काही दिवसांपूर्वीच केली होती. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. राज्यात आता मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू करता येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.