सी.पी.आर रुग्णालय अपुऱ्या सुविधांपासून मुक्त करा : भाजपा शिष्टमंडळाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी 

- Advertisement -

कोल्हापूर दि.२२ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य, गोर-गरीब लोकांचा आधारवड असणारा  दवाखाना, जिल्ह्याची आरोग्य वाहिनी म्हणून छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सी.पी.आर) ओळखले जाते.  ग्रामीण भागातून नागरिक याठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात परंतु सध्या या आधारवड असणाऱ्या रुग्णालयात रुग्णांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आधारवड असे मोठे नाव, मोठी इमारत पण सुविधा मात्र अपुऱ्या अशी सद्यस्थिती निर्माण झाली आहे.  याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मा.नाम.हसन मुश्रीफसो यांची शासकीय विश्रामगृह याठिकाणी भेट घेऊन निवेदन सादर केले. 

रुग्णालयात अनेक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा म्हणून सी.पी.आर रुग्णालयाला पुरेशा सुविधा उपलब्ध करून गोर-गरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी याद्वारे करीत आहे. 

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सी.पी.आर रूग्णालयाच्या असुविधांचा उल्लेख केला आहे.  त्याचबरोबर पुढील प्रमाणे अनेक मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये 

१) मेंदूला गंभीर इजा झालेल्या अपघातग्रस्त रुग्णांना आपल्याकडे तज्ञ न्युरोसर्जन असताना देखील परत पाठवले जाते. याविषयी वर्षानुवर्षे रूग्णालयाकडे काहीच उपाययोजना होत नाही. अशावेळी सुविधा नसल्याने अनेक रुग्णाचे प्राण जात आहेत. अशा रुग्णांवर त्वरित उपचार करण्याकरीता अत्यावश्यक असलेले उपकरण न्यूरो सर्जरी मायक्रोस्कोप उपब्ध होणेकरीता शासन स्तरावर अजूनही कोणती कार्यवाही झालेली नाही.

२) स्त्रीरोग प्रस्तुती विभागाकडे दररोज ३० ते ४० प्रस्तुती होतात यावेळी गंभीर नवजात शिशुना अत्यावश्यक असणाऱ्या Paediatric Ventilator ची उपलब्धता फक्त ६ असून त्यापैकी  देखील २ बंद अवस्थेत आहेत. Multipara monitors ७ पैकी तब्बल ५ बंद आहेत.  Incubator box ऐनवेळी मिळत नसल्याने नवजात बालकांना बाहेरील रुग्णालय जावा असा अजब सल्ला दिला जातो हे ताबडतोब थांबवून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याठीकाणी आणखीन २० बॉक्स आवश्यक आहेत. खाजगी रुग्णालयात यासाठी मोठा खर्च होत आहे. 

३) मिरजे सारख्या तालुक्याच्या ठिकाणी १५ ते १६ कोटी रुपयांचे अत्याधुनिक MRI मशीन उपलब्ध आहे परंतु याठिकाणी हे मशीन उपलब्ध नाही हे मशीन उलब्ध झाल्यास डोक्याची गंभीर दुखापत, पायाची दुखापत, लीगामेंट याचे निदान होऊन उपचार लकवर होण्यास मदत होणार आहे. अन्यत्र या तपासण्या करण्यासाठी ५ ते ६ हजार खर्च असून हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे.  

४) अपंग व पाय फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर जावे लागते अशा रुग्णांना नातेवाईक उचलून घेऊन धोकादायक प्रवास करीत जिन्यातून वाट काढत जावे लागते.  या ऐवजी गोदावरी इमारती मध्ये हि ओपीडी का सुरु करू शकत नाही ?  याबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

५) असाच त्रास टीबी रुग्णांना असून रुग्ण धापा टाकत इलाज घ्यायला जात आहेत त्यांचीही ओपीडी तळमजल्यावर सुरु करावी.

६) भुलतज्ञ व शल्य चिकित्सक हे पूर्वनियोजित सर्जरी करीता आलेल्या पेशंटना शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री उपाशी राहण्याच्या सूचना देतात आणि अचानकपणे दुपारी २ वाजता त्यांना सर्जरी रद्द झाली आहे ती पुढे करण्यात येईल असे सांगितले जाते यामुळे अनेक रुग्ण उपचार घेताना उपाशी राहत आहेत याचा काडीमात्र फरक या डॉक्टरांवर दिसून येत नाही. वारंवार या सर्जरी पुढे ढकलण्याचे कारण काय ?

७) सिआर्म मशीन सी.पी.आर सारख्या रुग्णालयात नाही यामध्ये प्रोस्टेट ग्रंथी आणि किडनी स्टोनचे उपचार केले जात असून हे अत्यावश्यक मशीन लवकरात लवकर याठिकाणी उपलब्ध व्हावे.

वरील गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार होऊन सीपीआर रुग्णालयात सुयोग्य सुविधा पुरवून रुग्णांना दिलासा मिळावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केली. 

यानंतर भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनी देखील याविषयात आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये डॉक्टर भरती, वर्ग ४ ची १२५ पदे रिक्त असून हि लवकर भरण्यात यावी, ६७ कर्मचारी २० वर्षापासून याठिकाणी काम करत असताना त्यांना अद्याप पर्यंत कायम करण्यात आलेले नाही, सध्याचा अपघात विभाग या रूग्णालयाच्या मानाने अपुरा असून वर्षानुवर्षे याच ठिकाणी गर्दी होताना आपण बघतोय त्यामुळे या विभागाचा विस्तार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ICU विभागात व्हेंटीलिटर कमी आहे, ४ लिफ्ट याठिकाणी असून एकही लिफ्ट मन नाही अशा अनेक अपुऱ्या गोष्टींच्या गर्तेत हे रुग्णालय सापडले असून आपण या रुग्णालयाला नवसंजीवनी देण्याची मागणी याप्रसंगी त्यांनी केली.

यानंतर उपस्थित पदाधिका-यांनी सी.पी.आर रूग्णालया बाबत अनेक सूचना मांडल्या यामध्ये भाजपा जिल्हा चिटणीस अतुल चव्हाण यांनी या रूग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असणारे जुने गेट पूर्ववत करावे, जिल्हा चिटणीस संतोष भिवटे यांनी सामान्य पावती करण्यासाठी नागरिकांना तसेच काही परिस्थिती मध्ये रुग्णाला स्वत: २ तास रांगेत उभे रहावे लागत असून त्याऐवजी प्रत्येक विभागाच्या ठिकाणी हि सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली यानंतर लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर यांनी डायलेसीस विभागात १० मशीन असून त्यापैकी ५ मशीन बंद आहेत याचे कारण याठिकाणी असणारा  RO प्लांट बंद आहे त्यामुळे हा प्लांट तात्काळ सुरु करावा जेणेकरून १० डायलेसीस करता येतील.

भाजपा शिष्टमंडळाच्या सी.पी.आर रूग्णालयाच्या समस्यां, असुविधांबाबत दिलेल्या निवेदनाला उत्तर देताना पालकमंत्री मा.नाम.हसन मुश्रीफ म्हणाले, शिष्टमंडळाच्या मागण्या रास्त असून याविषयात असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या खात्याचा मंत्री म्हणून पदभार स्विकारल्या नंतर हे रुग्णालय शासकीय महाविद्यालया बरोबर सर्व सोयीयुक्त अद्यावत रुग्णालय करण्यासाठी ११०० बेडचे सामान्य रुग्णालय होणेसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय, २५० बेडचे सुपर स्पेशालिटी २५० कॅन्सर रुग्णांसाठी याबात निविदा ८ दिवसांत निघतील. त्याचबरोबर असलेल्या हॉस्पिच्या दुरुस्तीसाठी ४६ कोटी रुपये रस्ते, लिफ्ट, ड्रेनेज यासाठी निधी देण्यात येणार आहे.  MRI मशीन बाबत मंत्रीमंडळाने निर्णय घेतला असून ज्याठिकाणी अशी मशीन नाहीत त्या ठिकाणी लवकरच PPP तत्वावर निविदा काढून त्याला सरकारी तत्वावर मान्यता देऊन हे मशीन महिना भराच्या आत याठिकाणी उपब्ध करण्यार असल्याचे सांगितले. तसेच लहान मुलांच्या Paediatric Ventilator, Incubator box या व्यवस्थेबाबत रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत तात्काळ या रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना सूचना देऊन या सुविधांविषयी मागणी मागून घेऊन प्रशासकीय मान्यता तात्काळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा शिष्टमंडळाच्या या मागण्या येत्या महिना भरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला देण्यात आले. 

यावेळी प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, संजय सावंत, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, राजू मोरे, गणेश देसाई, शैलेश पाटील, धनश्री तोडकर, भरत काळे, संतोष भिवटे, अतुल चव्हाण, रशीद बारगीर, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगल निपाणीकर, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, आजम जमादार, अशोक लोहार, अभय तेंडुलकर, किसन खोत, अनिल कामत, सतीश आंबर्डेकर,   दिलीप बोंद्रे, हर्षद कुंभोजकर, डॉक्टर शिवानंद पाटील, सयाजी आळवेकर, सचिन कुलकर्णी, सुरेश गुजर, अमित पसारे, विजय गायकवाड ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles