महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे अशा मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल 600 पेक्षा जास्त अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली.
मुलींना मोफत शिक्षण
आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील, यासाठी विशेष अभियान राबवावे, अशा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर मुलींच्या शुल्क माफीविषयी चर्चा केली होती. आज महाराष्ट्रामध्ये एससी आणि एसटी यांना पुर्ण फी माफ आहे. केंद्र सरकार ६०% आणि राज्य सरकार ४०% सवलत देतं. त्याधरतीवर ओबीसी आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अतिमागासवर्गीयांसाठी ६४२ कोर्सेसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निम्मे फी सुरु झाली. मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या मुलीने चिठ्ठीत असं लिहिलं की, माझी निम्मे फी सरकार भरतंय त्यासाठी धन्यवाद. पण उरलेली निम्मे फी भरण्यासाठी माझ्या आई-वडिलांकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी आत्महत्या करतेय. आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी प्रसारमाध्यामांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
त्या अनुषंगाने उच्च शिक्षणासाठी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, असे विविध ६४२ व्यावसायिक अभ्यासक्रम आणि नव्याने सुरू होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला स्थापनेनंतर शिक्षकांची नवीन पदे मंजूर झालेली नाहीत. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी येत्या मंगळवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन आजवर विद्यापीठाने शिक्षक पदांसाठी दिलेले प्रस्ताव आणि त्यांची स्थिती याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
मुलांनाही मोफत शिक्षण द्या..
या कार्यक्रमानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावरून बाहेर पडत असताना विद्यार्थी तरुणांनी त्यांना अडवत केवळ मुलींना सवलत देण्याच्या बाबत नाराजी व्यक्त केली. राज्यातील मुलींप्रमाणेच आम्हालासुद्धा शिक्षणाची मोफत शिक्षण द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबाबत संवेदनशिल असून त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.