नागरिकांना डिजिटल सेवा पुरवठ्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री ॲड. आशिष शेलार

राज्यात आधार सेवा केंद्रांची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. महानगरांपासून ते दुर्गम खेड्यांपर्यंत, नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सहजपणे मिळू लागल्या आहेत. प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल सेवा पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. २,९११ नवीन आधार नोंदणी किट्स खरेदी करून डिजिटल दरी दूर करण्यात आली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवा सहज उपलब्ध होतील, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामस्तरीय उद्योजकांना (Village Level Entrepreneurs – VLEs) नवीन आधार किट्सचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, मुंबई उपनगरचे अपर जिल्हाधिकारी सुभाष काकडे, कक्ष अधिकारी मुकेश सोमकुंवर, आधार सल्लागार अमित बाजपेयी, अनुराग मित्तल, प्रकल्प अधिकारी विजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढील एका महिन्याच्या कालावधीत शून्य ते पाच वयोगटातील मुलांची आधार नोंदणी आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन प्रक्रिया वाढवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला पवित्र अधिकार आहे. या भावनेने आणि जबाबदारीने ग्रामस्तरीय उद्योजकांनी काम केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र आधार नोंदणी आणि प्रमाणीकरणामध्ये आघाडीवर आहे, ही गोष्ट अभिमानास्पद आणि समाधानाची आहे. राज्यातील ६,७०० आधार किट्सपैकी २,७०० किट्स केवळ माहिती तंत्रज्ञान संचालनालयाद्वारे व्यवस्थापित केल्या जात आहेत. त्यामुळे आधार सेवा पुरवठादारांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आज २,९११ नवीन आधार नोंदणी किट्स वितरित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आधार सेवा पुरवठ्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. या किट्समुळे महानगरी भागांपासून ते दुर्गम ग्रामीण भागांपर्यंत प्रत्येक नागरिकाला आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सहज उपलब्ध होतील. डिजिटल सेवांचा वेग वाढवण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.

डिजिटल सेवांचा प्रसार आणि नागरिकांपर्यंत त्यांचा सहज आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन प्रक्रिया महत्त्वाची आहे. यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग दाखवावा, अशी अपेक्षा आहे. यामुळे डिजिटल आधार सेवांचा जलद विस्तार होऊन नागरिकांना त्याचा अधिक लाभ मिळेल, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी शिल्पा नातू यांनी प्रास्ताविक करून आभार व्यक्त केले.”

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com

LATEST Post