माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याबाबत वादग्रस्त विधान करत नवा वाद निर्माण केला आहे. “मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का साजरं होतं? इतर राज्यांमध्ये का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून नवा वाद
सध्या महाराष्ट्रात विविध राजकीय आणि सामाजिक वाद पेटले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावरूनही मोठी चर्चा रंगली होती. त्यातच आता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
वडेट्टीवार म्हणाले,
“मी गुढी-बिढी काही उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही आनंदाची गुढी कशाला उभारायची? आम्ही या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं त्याने पडावं. मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का साजरं होतं? इतर राज्यांत का नाही?”
त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.
एकीकडे शुभेच्छा, दुसरीकडे वादग्रस्त विधान
विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. रविवारी (X, पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं होतं –
“गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो!”
मात्र, दुसऱ्याच दिवशी गुढीपाडव्यावर सवाल उपस्थित केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 30, 2025
गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची!
नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. pic.twitter.com/IcvFVSQhb3