इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश|

भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दि. २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) व त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे (Rahul Awade) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दि. २५ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आवाडे पिता-पुत्रांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यामुळे आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अडचणी कमी झाल्याचे समजले जाते.

प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि सुपुत्र राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. याशिवाय, त्यांनी जयश्री कुरणे यांना हातकणलंगलेमधून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. प्रकाश आवाडे व त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल आवाडे यांची इचलकरंजीमधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मुंबईतील भेटीगाठीत प्रकाश आवाडे यांनी मुलासाठी उमेदवारीचा शब्द घेतल्याची चर्चा आहे.

आवाडेंच्या प्रवेशाने इचलकरंजीसह अन्य दोन मतदारसंघात भाजपला बळ :

2019 च्या इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे ताराराणी पक्षाच्या वतीने माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकूनही आले. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तसेच लोकसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळवून दिले. बरेच दिवसांपासून मतदारसंघात अशी चर्चा होती की प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये जातील परंतु या चर्चेला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता इचलकरंजी, हातकणलंगले आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलणार आहेत. आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने भाजप व महायुतीचा फायदा होणारा आहे हे मात्र निश्चित आहे. बँका, सहकारी संस्था, कारखाना यांच्या माध्यमातून त्यांनी इचलकरंजी मतदारसंघासह अन्य दोन मतदारसंघात आपला स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद व इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपची ताकद वाढली आहे.


इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राहुल आवाडे (Prakash Awade) यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांच्या ताकदीमुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ महायुतीला जिंकणे अगदी सोपे आहे. परंतु सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याने त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com