महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) व्याप्ती वाढविण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याचा विचार केला जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणखी सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांत मदत पोहोचवली. कोविड संसर्गाच्या कालावधीत कक्षाने महाराष्ट्राबाहेरही काम केले. गेल्या पाच वर्षांत साडेतीन हजार मुलांवर कक्षाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत दिली. केरळ, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुराच्या आपत्ती वेळी कक्षाच्या माध्यमातून मदत केली.

म्हैसाळ योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच दोन हजार कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात सांगली जिल्ह्यातील काही गावांतील नागरिकांनी मागणी केली होती. सीमाभागातील गावांतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहोत. त्यांच्याशी चर्चा करीत आहोत. तेथील प्रशासनाला समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी वैद्यकीय कक्षाचे समन्वयक मंगेश चिवटे, गणेश शिंदे, डॉ. सुरासे, प्रा. ढवळे आदी उपस्थित होते.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com