स्वप्नील लोणकर च्या आत्महत्येने अजुन एकदा एमपीएससी चा कारभार कसा सुरू आहे याच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे . एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन २ वर्षे झाले तरी अजून पुढील प्रक्रिया होत नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून स्वप्नील ने आत्महत्या केली . खूप भयानक आहे .
स्वप्नील हा व्यवस्थेचा बळी आहे अजुन असे असंख्य स्वप्नील त्या वाटेवर आहेत आणि जे हे पाऊल उचलत नाहीत ते नैराश्यात , बेरोजगारीच्या विळख्यात अडकून , उमेदीचे वर्ष घालवून वाट बघत आहेत .
मुळात जे सरकार सत्तेत असते ते सर्वच दोषी आहेत . सर्व पक्ष तेवढेच याला उत्तरदायी आहेत . मुळात एमपीएससी करण्याचा निर्णय जरी उमेदवाराचा वयक्तिक असेल तरील त्याला पूरक वातावरण करण्याची जबाबदारी सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांची आहे .
मागील ३-४ वर्षापासून एमपीएससी तील सावळा गोंधळ दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून , निवेदने देऊन , मोर्चे काढून , उपोषण करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .
एमपीएससी विद्यार्थी संघटना मध्ये सुरू असलेले गट तट , पक्षाचे सुरू असलेले घाणेरडे राजकारण , प्रशासकीय स्तरावरील उदासीनता आणि आयोगाचा भोंगळ कारभार या सर्व गोष्टी तेवढ्याच कारणीभूत आहेत .
एमपीएससी आयोगाचे पूर्ण सदस्य नाहीत .
एमपीएससी आयोगाकडे पूर्ण संख्येने कर्मचारी नाहीत.
सामान्य प्रशासन विभाग , राज्य शासन आणि आयोग याच्यांतील समनव्ययाचा अभाव.
याच्यामुळे पदभरती , निकाल , जोईनिंग यांच्यासारखे अगणित प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर आहेत , पालकांना यातील वास्तव माहीत नसते त्यामुळे नकळत विद्यार्थ्यावर कोटुंबिक दबाव जस जस वय वाढत जात तस वाढत जातो , स्वतः बद्दल आत्मविश्वास कमी होत जाणे या गोष्टी घडतात.
सर्वांनी याच्याकडे जबाबदारीने पाहणे महत्वाचे आहे . सर्व प्रथम एमपीएससी ही वेळखाऊ आणि संयमाची परीक्षा आहे , प्रसंगी अपयश येऊ शकते कारण यशस्वी होण्याचे प्रमाण १% पेक्षा कमी हे समजून घेतले पाहिजे . ९९% विद्यार्थी हे अपयशी होणार आहेत मग त्यांनी प्लॅन ब याचा जरूर विचार करूनच स्वतः ची जबाबदारी स्वतः घेऊन या क्षेत्रात यावे . एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे शासनाने धोरण आखताना खूप बदल करावे लागणार आहेत वेळोवेळी शासनाला हे बदल सुचवले आहेतच .
विद्यार्थी मित्र मैत्रिणीस प्रेमळ सल्ला , बाळांनो ही परीक्षा म्हणजे अंतिम सत्य नाही जीवनात खूप काही आहे त्यामुळे एक परीक्षा हरली म्हणून टोकाचे पाऊल उचलू नका , आपल्या आई वडिलांचा कुटुंबाचा विचार करा . शेवटी परीक्षा पास होऊन जे मिळवायचं ते न परीक्षा पास होता आलेल्या अनुभवातून इतर क्षेत्रात मिळवता येत त्यासाठी सकारात्मक विचार आणि लढण्याची वृत्ती ठेवा तरच या क्षेत्रात या .
अनुप अरुणा रावसाहेब देशमुख
(अरुणोदय फाऊंडेशन)