Pandharpur Election live Result | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
पंढरपुरात सकाळी ८ वाजता नियमाप्रमाणे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदारसंघाचा आकार आणि एकूण मतदारांची संख्या पाहाता दुपारपर्यंत पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली.
त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ असेल, याची उत्सुकता सध्या लागली आहे. त्याशिवाय, स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाल्याचं दिसून आलं.
- सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात, दुपारी 12 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता
- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, कोरोनामुळे जमावबंदीचा आदेश
- घराबाहेर फिरुन मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही
- निकाल ऐकण्यासाठी घरात बसून आकाशवाणी तसेच voter helpline app याचा वापर करण्याचे आवाहन
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश
भाजपा वि. महाविकासआघाडी
गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.