कारिवडे: येथील ग्रामपंचायत (Karivade Gram Panchayat) कार्यालयाच्या माध्यमातून जी काही शैक्षणिक,आरोग्य, सामाजिक विकास कामे केली गेली त्यांचा दर्जा आणि त्या विकास कामांवर मंजूर झालेला निधी यामध्ये फार तफावत दिसून येते हे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामसेवक सरपंच यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान ग्रामस्थांच्या चौकशीला ग्राम सेवक व सरपंच समाधानकारक उत्तर देत नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आलं ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेची मागणी केली तरी सुद्धा ग्रामसेवक व सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्या पद्धतीनं गेली दीड वर्ष पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारा मार्फत या गोष्टींची कल्पना ग्रामस्थांनी वेळोवेळी दिलेली आहे. गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. पर्यायाने ग्रामस्थांनी दिनांक 27 /10/ 2022 रोजी पंचायत समिती राधानगरी कार्यालयात जाऊन बी.डी.ओ.ना निवेदन दिले. या सात दिवसात ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांच्या आढावा संदर्भात चौकशीसाठी अधिकारी पाठवून तात्काळ ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावेत व घोटाळेबाजांवर कठोर करवाही करण्यात यावी. अन्यथा आठव्या दिवशी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. हे निवेदन उमेश चव्हाण,विस्ताराधिकारी पंचायत समिती राधानगरी यांना दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वास राऊत, चैतन्य पाटील, प्रशांत देसाई, विश्वास पाटील, ग्रामपंचायत सदस्य संभाजी राऊत आणि कारिवडे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.