पुणे जिल्ह्यात पुढच्या 7 दिवसांसाठी दिवसभर जमावबंदी तसंच संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे.

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शुक्रवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
तसेच, अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली
Bars, hotels, restaurants to remain closed for 7 days, only home delivery will be allowed. No public function, except funerals&weddings, will be allowed; max 20 people in funerals& 50 in weddings. Order to come into effect from tomorrow: Pune (Maharashtra) Divisional Commissioner
— ANI (@ANI) April 2, 2021
पुण्यात काय सुरु काय बंद?
- सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
- मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
- धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद
- PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
- आठवडे बाजारही बंद
- लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
- संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- दिवसभर जमावबंदी
- जिम सुरु राहणार
- दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
- शाळा महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद
गिरीश बापट यांच्या सूचना
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी यावेळी प्रशासनाला काही सूचना केल्या.
सामान्य नागरिकांवर कारवाई करताना पोलिसांनी काळजी घ्यावी. ग्रुपने बसणाऱ्या लोकांनी कायदेशीर कारवाई करावी. पण त्यांनी मारहाण करू नये, अशी सूचना बापट यांनी दिली.
पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था, दक्षता समिती असेल. बेडसची संख्या वाढवण्यासाठी एमबीबीएस, रिटायर्ड डॉक्टर यांना मदतीला घ्यावे. केंद्र सरकार जेवढी लागेल तेवढी लस देईल. असंही बापट म्हणाले.
पीएमपीएल बंद करू नये, ती 40 टक्क्यांनी सुरू राहावी. कामगारांसाठी पीएमपीएमएल ची व्यवस्था करायला हवी. हॉटेल्स बंद न करता उभे राहून खाण्याची व्यवस्था करावी. हातगाड्यांवर पाच पेक्षा जास्त लोक एकावेळी नको. संचारबंदी 8 नंतर सुरू ठेवायला हवी होती. दिवसभर जमावबंदी असावी, असं मत बापट यांनी मांडलं आहे.
यावर काय निर्णय होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.