कोल्हापूर, दि. 8 : कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या सर्वसमावेशक कामाच्या अहवालाचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आदिल फरास आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश क्षीरसागर यांनी तयार केलेला सर्वसमावेशक कामांचा सचित्रअहवाल पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
राजेश क्षीरसागर यांचा कार्य अहवालच त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. क्षीरसागर शिवसेनेचे निष्ठावान शिलेदार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार त्यांच्या नसानसात भिनले आहेत. त्यांचे धडाडीचे नेतृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व सर्वांना माहीत आहे. यापुढेही त्यांचे समाजकार्य असेच जोमाने सुरू राहो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी क्षीरसागर यांना दिल्या.
राजेश क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने केलेल्या विकासकामांचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामांचा समावेश आहे. गत निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून गेली साडेचार वर्षे अखंडित जनसेवेचे व्रत जोपासले. कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर शहरात सुरु असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा उल्लेख करण्यात आला आहे. याच बरोबर केंद्र सरकार आणि महायुतीच्या सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या याची सचित्र माहिती दिली आहे. तळागाळातील लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत निधीतून केलेल्या अर्थसाहाय्यची ही माहिती दिली आहे. यासह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची माहिती जनतेसमोर सादर केली आहे. कर्मचारी, रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले, व्यापारी यांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत समाजातील सर्वच घटकांना साद घातली आहे.
मतदारसंघातील लोकांपर्यंत आपण केलेल्या कामांची माहिती व्हावी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी या अहवालाचे प्रयोजन केल्याचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी कोल्हापूरकरांनी क्षीरसागर यांच्यासारख्या धडाडीच्या नेत्यास पुन्हा विधानसभेत पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राजेश क्षीरसागर यांचा कार्यअहवाल सर्वांगीण कामाचे उत्तम प्रगतीपुस्तक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Advertisement -