केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी यंत्रणा गतिमान करा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे, दि. 24: केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला वेग देणे गरजेचे असून त्यासाठी सर्व यंत्रणांना गतिमान करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. | Union Finance Minister Nirmala Sitharaman

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्याची केंद्रपुरस्कृत योजनांची आढावा बैठक विधानभवन येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, माधुरी मिसाळ, राहूल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर श्रीमती सीतारामन म्हणाल्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सौरपंप वितरण, सौर पॅनेलद्वारे ऊर्जानिर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याला उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देणारी प्रधानमंत्री कुसुम योजना प्रभावीपणे राबवावी. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची क्षमता पाहता अधिकाधिक योजनांचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑप्टीकल फायबर जाळ्याने गतिमान इंटरनेंट सेवा पुरवण्याच्या भारत नेट योजनेला गती द्यावी.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आढावा घेताना या योजनेंतर्गत आता केवळ शेतकरीच नाही तर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसायांचाही कर्जपुरवठ्यासाठी समावेश केलेला असून त्यानुसार कर्जवितरण होते का अशी विचारणा करुन श्रीमती सीतारामन यांनी यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोस्ट विभागाकडील प्रधानमंत्री जन विमा योजनेप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागात राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांविषयी माहिती दिली. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अमृत सरोवर योजना, प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय), मुळा मुठा नदी सुधार, संपूर्ण कचरा प्रक्रिया, पीएमपीएमल कडून विद्युत व सीएनजी बसेसद्वारे प्रदुषणास आळा आदीबाबत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, रिंग रोड आदींसाठीचे भूसंपादन, योजनांच्या लाभासाठी आधार लिंकींग, पीएम-किसान योजना आदींबाबत सादरीकरण केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी, पीएमएवाय आदी विषयक सादरीकरण केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो प्रकल्पाचे, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहूल महिवाल यांनी मेट्रो तसेच रिंगरोडबाबत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हर घर जल, पीएमएवाय- ग्रामीण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदींबाबत सादरीकरण केले.

यावेळी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विमानतळ यांच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटन, महापारेषण, महावितरण, डाक विभाग, बीएसएनएल, कृषी, कौशल्य विकास आदी विभागामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींसह केंद्र शासनाच्या विभागाचे तसेच राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here