दालमिया कारखाना, प्रदूषण, आणि आंदोलने ही पन्हाळा तालुक्यातील लोकांना आता नित्याचीच बाब झाली आहे. मागिल महिन्यात आसुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले होते. या आंदोलनाचा धसका घेऊन दालमियाचे युनिट हेड रंगाप्रसाद यांनी डिस्टिलरी प्रकल्प बंद करण्याचा आदेश दिलेला होता. काही दिवस प्रकल्प बंद करून पुन्हा चालू केल्यामुळे परत एकदा भागातील लोकांना प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे.परत एकदा धुराचे साम्राज्य पसरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 10-12 किलोमीटरवर धुराची चादर पसरली जाते. सध्या ढगाळ वातावरणामुळे धूर वरती आकाशाकडे स्पीडने जात नसल्याने तो खाली जमिनीकडे फेकला जात आहे. कारखान्यानेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम व अटींचे कितपत पालन केले जात आहे हा आता संशोधनाचा भाग झाला आहे.दालमिया कारखान्याविरोधात बरीच आंदोलने झालीत, निवेदन देण्यात आलीत पण फक्त आश्वासने देऊन सर्वांना शांत करण्यात आले. सामान्य जनतेला गृहीत धरून त्यांना मृत्यूच्या वाटेवर सोडलं जात आहे.अश्या तीव्र भावना गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी तर शेतात माळव करायचं सोडूनच दिलेलं आहे. अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी ही हवालदिल झाला आहे. सरकार तसेच कारखाना प्रशासन ही गोष्ट गांभीर्याने घेणार का हे महत्त्वाचे आहे.
कारखान्याच्या प्रदूषणाचे प्रत्यक्ष परिणाम आसुर्ले पोर्ले गावच्या लोकांच्या आरोग्यावर होत आहेत. फंगल इन्फेक्शन, दमा, केस गळती, कॅन्सर, या सारख्या भयंकर आजारांनी आसुर्ले-पोर्ले गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कारखान्याच्या बाजूलाच शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना ही प्रदूषण, तसेच तेथील उग्र वासाचा त्रास होत आहे. सामान्य नागरिकांची एकच अपेक्षा आहे कारखाना चालू असताना डिस्टलरी प्लांट चालू ठेवा नसेल तर डिस्टलरी प्लांट बंदच करा. भविष्यात जर याकडे लक्ष दिलं नाही तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.