केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यामुळे दोन्ही गटाला सोमवारी दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि नवीन चिन्हासाठी पर्याय देण्यास सांगितले होते. दोन्ही गटांनी तीन पक्ष नावे आणि तीन चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ BalasahebanchiShivsena आणि ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. तसेच ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पण त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हांबाबत आधीच भूमिका स्पष्ट झाली होती. तर तिसरा पर्याय म्हणजे गदा हे चिन्ह धार्मिक प्रतिक असल्यानं ते कुणालाही देता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाने आता तीन नवे पर्याय द्यावेत असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, शिंदे गटांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून आयोगाकडे दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे सादर करण्यात आली आहेत. ठाकरे यांच्याकडून पक्ष चिन्हासाठी त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय देण्यात आला होता. तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला होता.