राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राजकीय रणनित्या आखल्या जात आहेत. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje), प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आणि शेतकरी संघटना यांच्यासह इतर पाच छोट्या-मोठ्या संघटना व पक्ष एकत्र येऊन दि.१९ सप्टेंबर गुरुवार रोजी ‘महाशक्ती परिवर्तन आघाडी’ ची (Mahashakti Parivartan Aaghadi) घोषणा पुण्यातील बैठकीत त्यांनी केली. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात आपला सक्षम उमेदवार देणार आहेत अशी घोषणा तिसऱ्या आघाडीतील नेत्यांनी केली.
बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना (Eknath Shinde) आम्ही पत्र दिले आहे. या पत्रात 18 मागण्याचा प्रस्ताव मांडला असून मुख्यमंत्र्यांनी अजून त्यावर उत्तर दिलेले नाही. जर या पत्रातील मागण्या मान्य केल्या नाहीत तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, मी महायुतीतून बाहेर पडलो आहे, हे स्टॅम्प लिहून देऊ का? असे म्हणत बच्चू कडू यांनी महायुतील रामराम ठोकल्याचे जाहीर केले.
मनोज जरांगे व प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेणार ?
महाशक्ती परिवर्तन आघाडीचे नेतृत्व सार्वजनिक असणार आहे. यासंदर्भात समन्वय समिती तयार करून त्याद्वारे सर्व निर्णय घेण्यात येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडीमध्ये ज्यांना यायचे आहे, त्यांनी हमखास यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले. महाराष्ट्राचा सातबारा महाविकासआघाडी आणि महायुती यांच्या नावावर आहे का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.
राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील दोन बडया नेत्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना तिसऱ्या आघाडीत एकत्र घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले.