कोल्हापूर:- राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला असून दोन्ही गटाकडून जोर लावला जात आहे.
महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली २८ वर्षे सत्ता महाडिक गटाकडे राहिली असून याला पारंपरिक प्रतिस्पर्धी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आवाहन दिले आहे. गेली २८ वर्षे कर्जमुक्त असणारा कारखाना व ५ रुपये दराने सभासदांना साखर देणारा साखर कारखाना अशी या कारखान्याची ओळख जपली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जुना साखर कारखाना निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. राज्याचा राजकारणात खासदार धनंजय महाडिक यांचे वजन वाढले असून काँग्रेस मध्ये राज्याचा कार्यकारणीत मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हे बंटी पाटील यांना दिसत असताना ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
गेल्या काही निवडणुकांमध्ये महाडिक कुटुंबीय यांच्याकडून विविध सत्ता खेचत सत्तांतर घडवून आणले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीला बंटी पाटील आत्मविश्वासाने सामोरे जात असल्याचे दिसून येत होते. परंतु जसजसा प्रचार सुरू झाला तसतशी उलथापालथ सुरू झाली. माजी चेअरमन सर्जेराव माने हे पाटील गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे पाटील गटाचा आत्मविश्वास आणखी दुणावला परंतु हा आनंद अल्पघटकेचा ठरला. पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरले. अन् आक्रमक भाषणाने पाटील यांनी लक्ष वेधून घेतले.
एकीकडे सुरुवातीच्या टप्प्यात पाटील गट प्रचंड आक्रमक भूमिका घेत असताना महाडिक गटाचे नेते माजी अमल महाडिक आणि गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक संयमी भूमिका घेत प्रश्न उपस्थित केले. अन् अभ्यासू मांडणींने सभासदांची मने जिंकली. सुरुवातीच्या टप्प्यात अमल महाडिक यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांनी पाटील गटाला निरुत्तर केले.
माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या सक्रिय सहभागाने राजारामची पाटील गटाला अपेक्षित असणारी निवडणूक अधिक अवघड बनून गेली आहे. एकीकडे महादेवराव महाडिक यांना मानणारा गट अन् महाडिक कुटुंबीयांची ताकद तर दुसरीकडे बंटी पाटील व कुटुंबीय यांना मानणारा गट अशी पारंपरिक निवडणूक बनली असल्याने महाडिक गटाने डी. वाय. पाटील कारखान्यावर आघाडी उघडली. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली असून प्रत्यक्ष सभासद यांच्यावर याचा काय परिणाम होतो? सभासद कोणाला कौल देतात? हे येत्या २३ तारखेला मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर पडेल यात मुळीच शंका नाही.