आजकाल वाढदिवस म्हणजे केक, पुष्पगुच्छ, लोकांची गर्दी आणि उत्सवाचे वातावरण असते. मोठ्याप्रमाणात केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा सर्रास प्रघात आहे. पण भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी या समजुतीला फाटा दिला आहे. समाजातील गरजू मुलांना १० हजार फूड पॅकेट्सचे वितरण करत विश्वराज महाडिक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बुधवार दिनांक १७ मे रोजी विश्वराज महाडिक यांचा वाढदिवस कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याची विश्वराज महाडिक यांची भूमिका निश्चितच आदर्शवत आहे. महाडिक परिवार व सामाजिक उपक्रम यांचे जणू जन्मजात बाळकडूच विश्वराज यांना मिळाले आहे. कुटुंबियांच्या संस्कारातून व प्रेरणेतूनच विश्वराज हे देखील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गतवर्षी विश्वराज यांनी शेतीतील पहिल्या उत्पन्नातून भीमा परिवारातील सभासद व कार्यकर्त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले होते. इतकेच नाही तर घरापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या ऊसतोड मजुरांची व त्यांच्या मुलांची दिवाळी गोड करत त्यांनी फक्त मनेच जिंकली नाहीत तर समाजापुढे एक आदर्श देखील घालून दिला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपण्याकडे विश्वराज महाडिक यांचा कल असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळाले. वाढदिवसानिमित्त मुलांना त्यांच्या आवडीचे बर्गर, पिझ्झा, गुलाबजामून, फ्रेंच फ्राईज असे विविध दर्जेदार पदार्थ फूड पॅकेट्सद्वारे देण्यात आले. हातात फूड पॅकेट्स आल्यानंतर चिमुकल्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक या कार्याची पोहोच म्हणावी लागेल. कोल्हापुर येथील राजेंद्रनगर, मोतीनगर, यादवनगर, सदरबझार, लक्षतीर्थ वसाहत, विक्रमनगर, अवनी संस्था अशा विविध ठिकाणी गरजू मुलांना या फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.