महाविकास आघाडीत सरकारच्या पाठित सुरा खुपसला जात आहे, असं वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिला. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना अनुलेखाने टाळण्याचा प्रयत्न केल्याने उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. बारामती येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो.
दोन वर्षात पहिल्यांदाच शरद पवार यांनी थेट पटोलेंवर टीका करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पटोलेंच्या विधानाला आपण किंमत देत नसल्याचंही पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचंही या निमित्ताने अधोरेखित झालं आहे. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधानही त्यांनी केलं होतं.
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आधीपासून धुसफूस आहे. निधी वाटपापासून ते राष्ट्रवादीलाच सन्मान मिळत असल्यापर्यंतच्या विविध कारणामुळे महाविकास आघाडीत ठिणग्या उडाल्या. शिवाय स्वबळाचा नारा देण्यावरूनही महाविकास आघाडीत तू तू मै मै आहे. मात्र, अद्यापपर्यंत आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी कुणाही विरोधात वैयक्तिक नाव घेऊन टीका केली नव्हती.
नाना पटोलेंनी काय म्हटलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे, असंही नाना पटोले म्हणाले होते.