Achalpur Assembly Election 2024:अचलपूर विधानसभा मतदारसंघ हा अमरावती जिल्ह्यातील एक प्रमुख शहर म्हणून ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या सातपुड्याच्या कुशीत वसलेले असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे. सध्या हा मतदारसंघ खूप चर्चेत आहे कारण विद्यमान आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला आहे. अचलपूर विधानसभा (Achalpur Assembly) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बच्चू कडू यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 साली सलग चार वेळा केला आहे.
बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आहेत. 2019 च्या अचलपूर विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे आपल्या प्रहार जनशक्ती पक्षातून निवडणूक लढवून ते यशस्वीरीत्या निवडून देखील आले. 2022 मध्ये शिवसेना फुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले. परंतु अमरावती लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू हे महायुतीमध्ये असतानाही नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, परंतु बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षातून उमेदवार उभा केला. या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला.
बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी केलेल्या विविध आंदोलनांमुळेही ओळखले जातात. शेतकरी आणि जनहिताचा नेता म्हणून अचलपूर विधानसभा मतदारसंघात त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी, राजू शेट्टी, संभाजी राजे आणि बच्चू कडू यांनी एकत्रित मिळून ‘महाशक्ती परिवर्तन आघाडी’ स्थापन केली आहे. येणाऱ्या आगामी अचलपूर विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे ‘महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून’ निवडणूक रिंगणात असतील.
बच्चू कडू यांची ही भूमिका महायुतीला आव्हानात्मक ठरणार आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीला त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कारण बच्चू कडू हे सलग चार वेळा आमदार राहिल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून बच्चू कडू (Bacchu Kadu) निवडून येणार की नाही तसेच महाराष्ट्रात या आघाडीचा फायदा कितपत होणार हे येणारा काळाच ठरवेल. अमरावती जिल्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अचलपूर विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे.