शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वारंवार अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. यात अनेक विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना किरकोळ ते गंभीर स्वरूपाचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आघात सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा युवक कॉंग्रेसने मागणी केली आहे.(Youth Congress demands new entrance for Shivaji University in terms of security)
या समस्येच्या संदर्भात अभ्यास केला असता आम्हाला काही बाबी समजून आल्या.
- विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार (इन आणि आऊट गेट) हे जुन्या पुणे-बेंगलोर हायवे पासून केवळ दहा ते बारा फुटांवर आहे.
- प्रवेशद्वाराजवळ साहजिकपणे असणारी वाहनांची ये-जा, उभारलेले विद्यार्थी व इतर वाहने यासर्वांमुळे प्रवेशद्वार ओलांडल्या -ओलांडल्या क्षणी लगेच येणाऱ्या रस्त्याचा अंदाज लागत नाही.
- त्याचवेळी समोरून वेगाने येणाऱ्या वाहनाचा चालक आणि गेट मधून बाहेर येणारा वाहनधारक हे गोंधळले जातात व यातून अनेक किरकोळ ते गंभीर स्वरूपाचे अपघात घडले आहेत व वारंवार घडत आहेत
- मानव्यविद्या शाखे जवळील प्रवेशद्वार (गेट क्र. ३) हे रस्त्यापासून सुमारे तीस फूट आत आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
जिल्हा युवक कॉंग्रेसने खालील मागण्या केल्या आहेत.
१) विद्यापीठाचे प्रवेशद्वार रस्त्यापासून किमान चाळीस ते पन्नास फूट आत असावे.
२) विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची उंची आणि लांबी वाढवली जावी.
३) विद्यापीठाची भव्यता लक्षात घेता, त्यास साजेशे असे भव्य प्रवेशद्वार असावे.
४) उपरोक्त विषयाच्या संदर्भात कमिटी स्थापली जावी व त्यामध्ये संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असावा.