कोरोनाच्या संसर्गाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी केंद्राने साथ द्यावी, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्र सरकारला केली आहे.
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. तसेच या पत्रातून पंतप्रधानांकडे पाच मागण्याही करण्यात आल्या आहेत.
राज यांच्या पाच मागण्या
महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या
राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात
सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी
लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, आणि
कोविड रोगाचा उपचार करमअयासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
महाराष्ट्राची स्थिती सर्वात बिकट
गेल्यावर्षी कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिका रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असाताना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.