दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव मानल्या जाणाऱ्या रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

Live Janmat

सिने अभिनेते रजनीकांत यांना 2019 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो.

दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. यावेळी करोना संसर्गामुळे सर्व पुरस्कारांची घोषणा उशिरा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. Rajnikant movie

https://twitter.com/PrakashJavdekar/status/1377484564965253121?s=20

प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.’

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे १२ वे दाक्षिणात्य अभिनेते

दरम्यान, रजनीकांत हे १२ वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यापासून रजनीकांत यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

दक्षिण भारतात आहे देवाचा दर्जा

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं. आपल्या खास स्टाइल आणि अंदाजामुळे त्यांनी बॉलीवूडमध्येही स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात.

 एक नजर शिवाजी ते रजनीकांत, या प्रवासावर.

ही वर्षांतली तीच वेळ जेव्हा त्यांचा सिनेमा रिलीज होतो आणि त्यांचे फॅन्स भक्त बनून जातात, त्यांच्या पोस्टर्सचा दुग्धाभिषेक करतात, त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या सिनेमाला चक्क पहाटेपासून गर्दी करतात.

जाणून घेऊ या त्यांच्याबद्दलच्या या 12 महत्त्वाच्या गोष्टींमधून.

1. जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या 4 मुलांतील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव होय. 12 डिसेंबर 1950ला बेंगलुरूमध्ये शिवाजीराव यांचा जन्म झाला. हेच शिवाजीराव पुढे जाऊन रजनीकांत बनले.

2. रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर घर चालवणं कठीण होतं. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी हमाली केली. सुपरस्टार बनण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते.

3. रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी त्यांचं अभिनेता बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं. बहादूर यांनीच त्यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला सांगितलं. दोघे आजही मित्र आहेत.

4. बालचंद्र यांचा सिनेमा ‘अपूर्वा रागनगाल’ हा त्यांचा पहिला तामिळ सिनेमा होय. यात कमल हसन आणि श्रीविद्या यांच्याही भूमिका होत्या.

5. रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकांतून केली. त्यांनी साकारलेली दुर्योधनची भूमिका गाजली होती.

6. सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा नायक म्हणून समोर आले ते एस. पी. मुथुरमन यांच्या ‘भुवन ओरु केल्विकुरी’ या सिनेमातून! या सिनेमानंतर एस. पी. मुथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी चांगलीच जमली. त्यानंतर दोघांनी एकत्र 25 सिनेमे केले.

7. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे ‘बिल्ला’ होय. 1978ला आलेला अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ हा सिनेमा याच सिनेमाचा रिमेक होता.

8. रजनीकांत यांनी ‘मुंदरू मूगम’ या सिनेमात तिहेरी भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

9. टी रामा राव यांचा ‘अंधा कानून’ हा रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रिना रॉय यांच्याही भूमिका होत्या.

10. 1985ला त्यांनी 100 सिनेमे पूर्ण केले. ‘श्री. राघवेंद्र रजनीकांत’ हा त्यांचा 100वा सिनेमा होता. त्यात त्यांनी संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती.

11. रजनीकांत यांच्या ‘राजा चायना रोजा’ या सिनेमात प्रथमच अॅनिमेशनचा वापर करण्यात आला होता.

12. रजनीकांत यांनी तामिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगू सिनेमांसोबतच ‘भाग्य देबता’ या बंगाली सिनेमातही भूमिका साकारली आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com