भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना इशारा दिला आहे.
अजित पवारांवर जोरदार टीका
“अजित पवारांना राज्यात करोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
निवडणुकीसाठी जरी या पंढरपूर मतदारसंघात नियमावली लागू नसली तरी प्रचारामुळे इथं कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यात कोणत्याही पक्षाचा अपवाद नाही. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके तर भाजपचे समाधान आवताडे यांच्यात ही मुख्य लढत होतेय.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री, सत्ता कोणाचीही असो, अजित पवार हेच उपमुख्यमंत्री असतात.
टरबूज-खरबूज-चंपा
पंढरपूरच्या शिवाजी चौक येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केला. तसेच त्यांच्यावर टीका करताना टरबूज-खरबूज असे शब्द वापरले आहेत.
अजित पवारांना यावेळी इशारा देताना ते म्हणाले की, “खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील”.
प्रचारसभांचा धडाका पण सरकारचे दुर्लक्ष
8 आणि 9 एप्रिलला अजित पवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मोठ्या सभा घेतल्या. एकीकडे राज्यात कोरोनामुळे राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमांसाठी गर्दी जमली होती.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सरकारी नियमांना केराची टोपली दाखवली.
हीच परिस्थिती भाजपच्या समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेतही आढळली आहे. भाजपच्या प्रचारसभेत सहभागी झालेले रणजितसिंह मोहीते पाटील यांना तर कोरोनाची लागणही झालीये.
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने बंद सभागृहात 50 तर खुल्या ठिकाणी 200 लोकांची परवानगी दिलीये. पण इथल्या प्रचारसभांना मोठी गर्दी होतेय, लोक मास्क घालत नाहीयेत, सॅनिटायझरची व्यवस्था नाहीये. सर्व पक्षांच्या प्रचारसभांत हेच चित्र आहे.