348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.
याआधी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर इत्यादी सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेत, मराठा आरक्षणासाठी समर्थनाची भूमिका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर लवकरच आपण मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करू असं ते म्हणाले होते.
मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला
“तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितलं आहे. हो आहे मी संयमी. पण आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.