मुंबई, दि. 17 :- रायगड जिल्ह्याची माहिती देणाऱ्या ‘समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण’(Samagr Raigad) या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन झाले.
यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण’(Samagr Raigad) या कॉफी टेबल बुकमध्ये प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे – गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक – धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग – कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशी उपयुक्त माहिती आहे. बुक निर्मितीमध्ये रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व मीडिया आर अँड डी दिलीप कवळी यांनी सहभाग घेतला आहे.