जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हणतात ते यासाठीच. कारण काहीतरी वेगळ करण्याची जिद्द लोकांच्यात नेहमी असते. अशीच एक गोष्ट एका बापाने आपल्या लेकीच्या स्वागतासाठी केली आहे. लेक जन्माला आल्यानंतर बापाने आपल्या लेकीचे स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढून केले. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात लेकीची हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आल्याने कोल्हापूरच्या पंचक्रोशीत कुतूहलाचा विषय झाला आहे.
Kolhapur | कोल्हापुरातील ‘या’ गावात खरंच सोन्याचा पाऊस पडतो?
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी | MSKPY
विशेष बाब म्हणजे मिरवणुकीतून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. मुलीचे नाव ईरा असे ठेवण्यात आलं आहे. शिवाय स्वागतासाठी ढोल ताशा आणि मर्दानी खेळ खेळाचे देखील आयोजन करण्यात आले होते. ही गोष्ट घडली आहे कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचगावमध्ये. गिरीश आणि मनीषा पाटील यांना पाच महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले. पाटील कुटुंबीयांनी लाडक्या कन्येचं स्वागत अगदी धुमधडाक्यात करण्याचे नियोजन केले.
या मिरवणुकीतून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा सामाजिक संदेश देण्यात आला. लेकीचे स्वागत करण्यासाठी चक्क हत्तीवरून आणि रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत नटवण्यात आले होते. तसेच त्यांच्या हातात सामाजिक संदेश देणारे फलक देण्यात आले होते. मुलींच्या जन्माबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कोल्हापूरकरांचा नादच खुळा म्हणतात ते यासाठीच.